सिद्धीविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाला मुहूर्त मिळेना!; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्यग्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 09:56 IST2026-03-26T09:54:43+5:302026-03-26T09:56:48+5:30
या सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी कार्यादेश देऊनही कामाची सुरुवात झालेली नाही.

सिद्धीविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाला मुहूर्त मिळेना!; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री व्यग्र
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वेळ उपलब्ध होत नसल्याने प्रभादेवी येथील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या शुभारंभाचा मुहूर्त होऊ शकलेला नाही.
सिद्धीविनायक न्यासाकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते परिसर सुशोभीकरणाचा शुभारंभ करण्याचा प्रयत्न सुरू असून, राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कामात ते सध्या व्यस्त आहेत. या सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी कार्यादेश (वर्कऑर्डर) देऊनही कामाची सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हे काम रखडण्याची शक्यता आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासह भूमिगत पार्किंगची व्यवस्थाही केली जाणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची निवड डिसेंबर २०२५ मध्ये करण्यात आली होती. हे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी कंत्राटदाराला डिसेंबर मध्येच कार्यादेश देण्यात आले होते. त्यामुळे १५ डिसेंबर २०२५ पासून काम होणे अपेक्षित होते. याचा शुभारंभमुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते व्हावा, अशी सिद्धिविनायक न्यासाच्या कार्यकारणीची इच्छा असल्याने अद्याप मुहूर्त निश्चित झालेला नाही.
'तुम्हीच करा शुभारंभ'
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाकडे न्यासातर्फे वेळ मागितली. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन व अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याने वेळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे शुभारंभाचा कार्यक्रम उरकून घ्यावा, असा निरोप मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून दिल्याचा समजते.
विघ्नहर्त्याच्या कामातच विघ्न
मंदिर परिसर सुशोभीकरणाचा कार्यादेश देऊनही कामाचा शुभारंभ होण्यात विघ्न निर्माण झाले आहे. या कामासाठी कंत्राटदाराला ७३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. परंतु तीन महिने काम रखडल्यामुळे या मुदतीत काम पूर्ण करणे आता शक्य होणार नसल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कशी असणार सुविधा ?
पार्किंग, आसन, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी छत, पूजेचे साहित्य, फुल विक्रेत्यांसाठी सुसज्ज स्टॉल अशा सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सुरक्षेसाठी सीसीटीव्हींची संख्या वाढवण्यात येणार आहे.