Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या, बांगलादेशी शब्दांमुळे भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 06:50 IST

नितेश राणे यांनी केलेल्या भाषणातून धार्मिक गटांमध्ये वैर आणि तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर चार गुन्हे दाखल केले आहेत.

मुंबई : नितेश राणेंसह अन्य भाजप नेत्यांच्या विरोधात धार्मिक भावना भडकविल्याचा गुन्हा दाखल करू शकत नाही. कारण त्यांनी भाषणात वापरलेले 'रोहिंग्या' आणि 'बांगलादेशी' हे शब्द भारतीयांच्या किंवा येथे असलेल्या समाजाच्या भावना दुखावू शकत नाहीत, अशी माहिती पोलिसांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

नितेश राणे यांनी केलेल्या भाषणातून धार्मिक गटांमध्ये वैर आणि तेढ निर्माण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर चार गुन्हे दाखल केले आहेत. मानखुर्द पोलिस ठाण्यात नितेश राणे यांच्यावर आयपीसी २९५ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, अन्य प्रकरणांत हे कलम लावू शकत नाही, अशी माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाला दिली.

पोलिस आयुक्तांनी राणे यांची भाषणे ट्रान्सक्राईब केली. त्यात राणे यांच्यावर २९५ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा निष्कर्ष पोलिस आयुक्तांनी काढला आहे, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. भाषणात 'रोहिंग्या' आणि 'बांगलादेशी' असा उल्लेख आहे. कायद्यातील तरतूद भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आहे. 'रोहिंग्या' व 'बांगलादेशी' हे भारतीय नाहीत आणि त्यांनी देशात बेकायदा प्रवेश केला आहे आहे. हे शब्द भारतीयांच्या भावना दुखावणारे नाहीत, असा युक्तिवाद वेणेगावकर यांनी केला. पोलिस आयुक्तांनी भाषण तपासले आहे. त्यामुळे सरकारी वकिलांचे म्हणणे आम्ही मान्य करतो, असे खंडपीठाने म्हटले, काशिमीरा पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केले आहे आणि अन्य गुन्ह्यांत आठ आठवड्यांत ते दाखल करण्यात येईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले.

याचिका काढल्या निकाली

• आयपीसी कलम १५३ (ए) आणि १५३ (बी) (धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व आणि असंतोष वाढविणे) अंतर्गत आरोपींवर खटला चालविण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरी आठ आठवड्यांच्या आत पोलिस घेतील, असेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

• जानेवारीमध्ये मीरा रोड, घाटकोपर, मानखुर्द, मालवण येथे भाजप आमदार नितेश राणे, गीता जैन आणि तेलंगणचे आमदार टी. राजा सिंह यांनी केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांविरोधात दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढल्या.

• मीरा रोड, घाटकोपर, मानखुर्द, मालवण येथे या नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याबद्दल जातीय हिंसाचार भडकला. त्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकांद्वारे करण्यात आली होती.

 

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालयनीतेश राणे