शिवसेनेला उशिरा आली जाग, मनसेपाठोपाठ '...आणि काशिनाथ घाणेकर'ला प्राईम टाईमचा शो देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:48 IST2018-11-10T20:43:00+5:302018-11-10T20:48:45+5:30
मुंबईच्या हिंदमाता गोल्ड सिनेमामध्ये ...आणि काशिनाथ घाणेकर हा चित्रपट प्राईम टाईमचा शोमध्ये न दाखवण्यात आल्यामुळे स्थानिक प्रेक्षकांनी तक्रार केल्यानंतर मनसेपाठोपाठ आता शिवसेनेनं या वादात उडी घेतली आहे.

शिवसेनेला उशिरा आली जाग, मनसेपाठोपाठ '...आणि काशिनाथ घाणेकर'ला प्राईम टाईमचा शो देण्याची मागणी
मुंबईः मुंबईच्या हिंदमाता गोल्ड सिनेमामध्ये ...आणि काशिनाथ घाणेकर हा चित्रपट प्राईम टाईमचा शोमध्ये न दाखवण्यात आल्यामुळे स्थानिक प्रेक्षकांनी तक्रार केल्यानंतर मनसेपाठोपाठ आता शिवसेनेनं या वादात उडी घेतली आहे. शिवसेना चित्रपट सेनेच्या वतीने हिंदमाता गोल्ड सिनेमाला निवेदन देण्यात आले आहे.
हिंदमाता गोल्ड चित्रपटाचे व्यवस्थापक अमित सिंग यांनी वरिष्ठांना कळवून लवकरात लवकर आणि काशिनाथ घाणेकरचे शो प्राईम टाईममध्ये लावू, असे सांगितले. चित्रपट न लावल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. त्याप्रसंगी शिवसेना चित्रपट सेनेचे चिटणीस बाळा लोकरे व शाखा समन्वयक अभिषेक बासूतकर युवा सेना सहसचिव मयूर कांबळे, रितेश सावंत, किरण देशमुख, अमेय रावणाक, सुदर्शन मयेकर उपस्थित होते.
सिनेमाला तात्काळ प्राईम टाईम म्हणजेच संध्याकाळच्या वेळेतील शो न दिल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा मल्टिप्लेक्सना देण्यात आला आहे. ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाला प्राईट टाईम द्या, अन्यथा पीव्हीआर व सिनेमॅक्समध्ये तोडफोड करू, असा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे. काशीनाथ घाणेकर सिनेमाचा दिवसभरात केवळ एकच शो दाखवण्यात येत असल्यानं प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 8 नोव्हेंबरला रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र सिनेमाचे कौतुक केले जात आहे. कल्याणमध्ये बहुंताश परिसर हा मराठी भाषिक आहे, मात्र सिनेमॅक्स थिएटरमध्ये या सिनेमाचा केवळ दुपारी तीन वाजताच शो आहे. यामुळे सिनेरसिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.