मुलुंडमध्ये कबुतरखाना नकोच! श्वसन व गंभीर स्वरूपाच्या आजारांचा धाेका; स्थानिकांची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:56 IST2025-11-07T13:56:04+5:302025-11-07T13:56:58+5:30
सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार

मुलुंडमध्ये कबुतरखाना नकोच! श्वसन व गंभीर स्वरूपाच्या आजारांचा धाेका; स्थानिकांची निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आणि गंभीर स्वरूपाचे आजार होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिले. मात्र केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे ऐरोली - मुलुंड जकात नाका येथे कबुतरखान्यासाठी जागा निश्चित केल्याचे सांगत मुलुंडकरानी त्याविरोधात गुरुवारी सायंकाळी मुलुंड स्टेशनच्या पूर्व भागात निदर्शने केली. पालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.
कबुतरांना कंट्रोल फीडिंग करण्यासाठी पालिकेने चार जागा निश्चित केल्या आहेत. त्यात ऐरोली-मुलुंड लिंक रोडचा समावेश आहे. नवी मुंबईला जोडणारा हा अत्यंत व्यस्त मार्ग आहे. येथे कबुतरखाना केल्यास मोठ्या प्रमाणात पक्षी गोळा होतील, असे स्थानिकांचे मत आहे. त्यातून दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढेल, असे मत सामाजिक कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी मांडले आहे. राज्य सरकारने या परिसरातील सुमारे १७ चौरस किलोमीटरचा भाग ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ म्हणून २०१५ मध्ये अधिसूचित केला होता.
कबुतरांना दाणे टाकण्याच्या निर्णयावर हरकत नोंदवणारे पत्र देवरे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला पाठवले आहे. कबुतरखाने स्वयंसेवी संस्थांनी चालवावेत, अशी अट असली तरी खुल्या जागेत सततची स्वच्छता राखणे, त्याचे काटेकोर पालन करणे अत्यंत कठीण असून प्रभावीपणे देखरेख करणे अवघड होईल, असाही मुद्दा ॲड. देवरे यांनी उपस्थित केला आहे.
...तर जागेवर जाऊन आंदोलन करणार
कबुतरखाना उभारण्याचा आदेश देऊन शासन जाणिवपूर्वक मुलुंडकरांकडे दुर्लक्ष करत आहे. प्रस्तावित जागेवर कबुतरखाना सुरू झालाच तर तेथे जाऊन आम्ही आंदोलन करू, असा इशाराही मुलुंडकरांनी दिला. २०० हून अधिक स्थलांतरित पक्षी, विशेषतः फ्लेमिंगो, बगळे, पाणकोंबडीसह इतर जातींचे पक्षी येतात. त्यामुळे त्यांच्या अधिवासावर गदा येईल, असेही स्थानिकांनी सांगितले.