गणेशमूर्ती पर्यावरणपूरक नसल्यास मंडपासाठी परवानगी नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 09:15 IST2026-03-30T09:15:00+5:302026-03-30T09:15:42+5:30
महापालिकेच्या भूमिकेमुळे मूर्तिकारांशी वादाची शक्यता

गणेशमूर्ती पर्यावरणपूरक नसल्यास मंडपासाठी परवानगी नाही!
मुंबई : गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली जाणार असली तरी जे मूर्तिकार पर्यावरणपूरक मूर्ती घडवतील, त्यांनाच ही परवानगी मिळणार आहे. त्यामुळे याही वर्षी विशेष करून प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घडविणारे मूर्तिकार तसेच मुंबई पालिकेत पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत. मंडपात 'पीओपी" मूर्ती घडविता येणार नाही. तसेच परवानगीचा उपयोग मूर्ती विक्रीसाठी करता येणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. यावर्षीचा गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी पालिकेने विशेष परिपत्रक जाहीर केले आहे. उत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा, तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी महापालिकेकडून मूर्तिकारांना तात्पुरता मंडप उभारण्यासाठी निःशुल्क परवानगी दिली जाते.
आवश्यक त्या परवानग्यांसाठी मूर्तिकारांना संगणकीय प्रणालीवर 'एक खिडकी योजना' २७ मार्च २०२६ पासून, पालिकेच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. मूर्तिकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरिता मार्गदर्शक बाबी स्पष्ट करणारे परिपत्रक पालिकेने प्रसिद्ध केले आहे.
महापालिकेच्या परिपत्रकात मूर्तिकारांसाठी काय ?
सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मूर्ती घडविण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारण्याकरिता परवानगीची प्रक्रिया एक खिड़की योजनेद्वारे संगणकीय प्रणालीमार्फत पालिकेच्या संकेतस्थळावर विभागीय सहायक आयुक्त व परिमंडळ उपआयुक्त यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल.
सार्वजनिक अथवा खासगी जागेवर मंडपांकरिता अर्ज सादर करताना मागील वर्षांची परवानगीची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक.
पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल, त्यासाठी अर्जदार स्वतः मूर्तिकार असणे अनिवार्य. मंडपाची परवानगी केवळ मूर्तिकारांसाठी असेल. याठिकाणी केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यात येईल. तेथे 'पीओपी' मूर्ती घडविता येणार नाही.