राजकीय पक्षाचा झेंडा नसला तरी झुंज दमदार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:55 IST2026-01-19T12:55:48+5:302026-01-19T12:55:48+5:30
काहींनी विजय मिळवला, तर काही ठरले 'रनर-अप'

राजकीय पक्षाचा झेंडा नसला तरी झुंज दमदार !
मुंबई: ना पक्षाचा पाठिंबा, ना मोठे आर्थिक बळ. केवळ आपल्या कामाचा दावा मतदारांसमोर करत अपक्ष उमेदवारांनी महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली. काही ठिकाणी त्यांनी थेट विजय खेचून आणला, तर काही प्रभागांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहूनही मतांची भक्कम ताकद सिद्ध केली.
प्रभाग क्रमांक ९२ भारतनगरमध्ये अपक्ष उमेदवार इब्राहिम कुरेशी यांनी ६,८११ मते मिळवत उद्धवसेनेचे हाजी सलीम कुरेशी यांचा पराभव केला. तर, भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ क्रांतीनगरमधून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या मनसेच्या अनिशा माजगावकर यांनी ८,०५५ मते घेत अपक्ष उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळवण्याचा मान पटकावला. विजय हुकला असला, तरी त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली.
प्रभाग क्रमांक ११४ मध्ये सर्वाधिक ६४.५३ टक्के मतदान झाले. तेथे खा. संजय पाटील यांची कन्या राजूल पाटील, मनसेच्या माजगावकर या अपक्ष, तर शिंदेसेनेतून सुप्रिया धुरत रिंगणात होत्या. त्यामुळे येथील अंतर्गत चढाओढीने येथील राजकारण तापले. त्यामुळे हा वाढलेला टक्का कुणाच्या बाजूने कौल देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राजुल पाटील यांनी ११,८१९ मते घेत विजयाचा गुलाल उधळला. अटीतटीच्या लढतीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या माजगावकर ८,०५५ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आल्या.
राजकारणातून संन्यास
प्रभाग क्रमांक १०९ तानाजीवाडीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे ६४.३ टक्के मतदान झाले. मुंबईतील सर्वाधिक २५ गुन्हे दाखल असलेल्या सज्जू मलिक यांना राष्ट्रवादी (अजित पवार) ने उमेदवारी दिल्याने हा प्रभाग विशेष चर्चेत आला होता. उद्धवसेनेचे सुरेश शिंदे यांनी येथे विजय मिळवला. पराभवानंतर अपक्ष उमेदवार गणेश जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली.
नार्वेकर यांची बाजी
यंदाच्या निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या प्रभाग क्रमांक २२६ हुतात्मा चौक येथे भाजपचे मकरंद नार्वेकर यांनी १८,०५८ मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे असलेले तेजल पवार यांनी ७,९९७ मते घेत दुसरा क्रमांक पटकावला. तसेच प्रभाग क्रमांक १४५ चिता कॅम्पमध्ये अपक्ष दीपक फालोड यांना दुसऱ्या क्रमांकाची ५,५५८ मते मिळाली, तर नेहल शाह यांना २,९७१ मते मिळाली.