प्रकल्पाला विरोध नाही, घराला घर द्या ! रहिवाशांची मागणी; MMRDAकडून झोपड्या तोडायला सुरुवात
By मनोहर कुंभेजकर | Updated: November 8, 2025 13:59 IST2025-11-08T13:58:24+5:302025-11-08T13:59:05+5:30
बोरिवली- ठाणे भुयारी मार्गासाठी मागाठाणेतील झोपड्यांवर कारवाई

प्रकल्पाला विरोध नाही, घराला घर द्या ! रहिवाशांची मागणी; MMRDAकडून झोपड्या तोडायला सुरुवात
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बोरिवली-ठाणे भुयारी मार्गासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील टाटा पॉवर हाउस, जय महाराष्ट्र्नगर परिसरातील दादासाहेब रूपवतेनगर, मिलिंदनगर, पल्लेवाडीतील झोपड्यांच्या पाडकामाला एमएमआरडीने शुक्रवारी सकाळपासून पोलिस बंदोबस्तात सुरुवात झाली. एमएमआरडीएने रहिवाशांना वर्षाचे घरभाड्याचे पैसे दिले असल्याने रहिवाशांनी फारसा विरोध केला नाही. प्रकल्पाला विरोध नाही. मात्र घराला घर द्या, अशी मागणी रहिवाशांनी केली. तोडकामाची कारवाई तीन-चार दिवस चालणार आहे.
पाडकामासाठी सकाळीच बुलडोझर आले होते. सकाळी एमएमआरडीचे अधिकारी, कर्मचारी, हातोडे घेऊन कामगार घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी मोठा पोलिस ताफा बोलाविण्यात आला होता. येथील रहिवाशांनी पाडकामाला विरोध केला नाही. मात्र, आम्ही तीन ते चार पिढ्यांपासून येथे राहत आहोत. आम्हाला घराला घर द्यावे, असे रहिवाशांनी सांगितले. पाडकामावेळी रहिवाशांचे डोळे पाणावले होते.
झोपडपट्टीवासीयांच्या खात्यात ११ महिन्यांचे दोन लाख २० हजार रुपये घरभाडे जमा झाले आहे. पैसे मिळालेल्यांनी भाड्याच्या घरांची व्यवस्था केली असल्याने सामान बाहेर काढले. सामानाची बांधाबांध केली. सायंकाळपर्यंत एक-एक रहिवासी सामान टेम्पोत भरून तेथून गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
घर पाडले तर आम्ही जायचे कुठे?
सोधर लगाडे या १९६८ पासून येथील दादासाहेब रूपवतेनगर येथील कपिला वास्तू चाळीत कुटुंबासह राहतात. मी रोज ६-७ किलोचे पापड तयार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. आम्ही भाडे घेतले नाही. त्यामुळे आता आमचे घर पाडले तर जायचे कुठे आणि पापड उत्पादन बंद पडल्याने घर कसे चालवायचे, असा सवाल त्यांनी केला.
घरभाड्याचे २.२० लाख मिळाले
- भीमराव पायले म्हणाले. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, आम्हाला सरकारने घराला घर दिले पाहिजे. दादासाहेब रुपवतेनगरमधील संतोष कांबळे येथे १९९९
- पासून राहतात.
- एमएमआरडीएने दिलेले २ लाख २० हजार रुपये घेऊन आम्ही भाड्याने घर घेतले आहे, असे त्यांनी सांगितले. सीता अहिरे यांनी सांगितले की, आमची झोपडी तोडली. १९७२ पासून आमच्या चार पिढ्यांनी येथे वास्तव्य केले आहे.
- रोज पापड तयार करण्याचे काम आम्ही करतो. आम्हाला वाऱ्यावर सोडू नका, घराला घर द्या, अशी विनंती त्यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि शिंदेसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांना केली आहे.
८८ जणांची ‘एसआरए’तून घरांची मागणी
रवी वरवटे हे जय महाराष्ट्रनगर येथे १९८३ पासून राहतात. आम्ही घरभाडे घेतलेले नाही. आमच्या ८८ झोपड्या या प्रकल्पात जाणार आहेत. त्यामुळे शासनाने आम्हाला एआरए प्रकल्पातून पर्यायी घरे द्यावीत, अशी आमची मागणी असल्याचे वरवटे यांनी सांगितले.