हाताने मैला उचलणारा कामगार नको; महापालिका करणार सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:05 IST2025-10-01T14:04:18+5:302025-10-01T14:05:10+5:30
महापालिका करणार सर्वेक्षण : १ ते १५ ऑक्टोबर नोंदणी करण्याचे कामगारांना आवाहन

हाताने मैला उचलणारा कामगार नको; महापालिका करणार सर्वेक्षण
मुंबई : हाताने मैला उचलणाऱ्या कामगारांची एकही नोंद २०२४ मध्ये झाली नव्हती. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने २०१३ च्या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरात हाताने मैला उचलणारे तसेच डोक्यावरून मैला वाहून नेणाऱ्या कामगारांचे १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान पालिकेकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणासाठी कामगारांनी संबंधित विभाग कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाच्या निर्देशांनुसार २०२४ मध्ये नोंदणी करण्यात आली होती. तेव्हा एकाचीही नोंद झाली नव्हती.
कायद्यानुसार पुनर्वसन करणे बंधनकराक
'हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ नुसार सफाई कामगारांना कोणत्याही प्रकारे मैला हाताने हाताळण्यास प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार पालिकेकडून यंदा पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
कामगारांनी १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान (शनिवार व रविवार वगळता) कार्यालयीन वेळेत (दुपारी २ ते सायं. ५) विभाग कार्यालयातील सहायक मुख्य पर्यवेक्षक (घनकचरा व्यवस्थापन) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
दंड करण्याची तरतूद
मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स कायदा - २०१३ च्या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या आणि कामगारांना हाताने मैला साफ करण्यासाठी नियुक्त करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था ही या कायद्याच्या कलम आणि कलमांतर्गत २ वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र ठरू शकते.
ते मैला उचलणारे नाहीत
> हाताने काम करणारा (मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स) याचा अर्थ, मैला पूर्णपणे कुजण्यापूर्वी उघड्या नाल्यातील मैला ज्या खड्यात टाकला जातो, तेथून मानवी मैला हाताने साफ करणारी, तो वाहून नेणारी, काढणारी किंवा अन्यथा कोणत्याही रीतीने हाताळणारी, अशी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणाद्वारे किंवा सरकारी किंवा खासगी प्राधिकरणाद्वारे कामावर लावलेली किंवा सेवानियुक्त केलेली व्यक्ती असा आहे.
> सफाई कर्मचाऱ्यामध्ये सामान्यपणे महानगरपालिका शासकीय किंवा खासगी कार्यालये यामध्ये सफाईगार किंवा सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती, कामगार (मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स) नसतात हे पालिकेने स्पष्ट केले आहे.