Join us
Daily Top 2Weekly Top 5

"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:44 IST

मराठी समाजाची १०० टक्के मते ५ पक्षात विभागली, त्यांनी २०-२० टक्के मते घेतली तरी आपण जिंकू शकतो असा विश्वास सुनील शुक्ला यांनी व्यक्त केला होता. 

मुंबई - राज्यात एकीकडे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्रित मैदानात उतरले आहेत. येत्या ५ जुलैला मुंबईत हिंदी सक्तीविरोधात मोर्चा निघणार आहे. त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील. मात्र यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यात उत्तर भारतीय विकास सेनेने पुन्हा एकदा मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच बनेल असं आव्हान दिले आहे.

उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी म्हटलं की, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि भाजपानेही कितीही कार्यक्रम घेतले तरी मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार आहे. उत्तर भारतीय यावेळी जागरूक झाला आहे. हे हिंदू विरोधी आणि हिंदीविरोधी लोक आहेत. सर्व उत्तर भारतीय एकत्रित येत उत्तर भारतीय उमेदवाराला जिंकवतील. येत्या काळात उत्तर भारतीय विकास सेनेचे उमेदवार मुंबईत जिंकतील आणि आमचाच महापौर बनेल असा दावा त्यांनी केला आहे. 

याआधीही सुनील शुक्ला यांनी मुंबईतील मतांचे गणित मांडून महापौरपदाबाबत दावा केला. संपूर्ण मुंबईत २ कोटी २० लाख लोकसंख्या आहे. त्यातील १ कोटी मराठी, १ कोटी उत्तर भारतीय आणि २० लाख इतर राज्यातील लोक आहेत. मराठी समाज ५ पक्षांमध्ये विभागला गेला आहे. जर आपण उत्तर भारतीय उमेदवार उभे करत असू त्याला निवडणूक लढवून जिंकवत असू. १० टक्क्यांपैकी ३ टक्के लोकांनीही उत्तर भारतीय उमेदवारांना मतदान केले तर आपला महापौर बनेल. मराठी समाजाची १०० टक्के मते ५ पक्षात विभागली, त्यांनी २०-२० टक्के मते घेतली तरी आपण जिंकू शकतो असा विश्वास सुनील शुक्ला यांनी व्यक्त केला होता. 

"आम्हीही मराठी, चांगल्या कामावर मत मिळतात..."

ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्याचा मराठी मतांवर परिणाम होईल का असा प्रश्न एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की,  ठाकरे मराठी असले तर मी कुठे पंजाबी, गुजराती आहे, मीदेखील मराठी आहे. माझ्याही पक्षाचा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आहेत. ते कुठे गुजरातमधून, आंध्र प्रदेशातून आले आहेत, त्यामुळे मराठी मतांवर कुणाची मक्तेदारी नाही. आम्ही चांगले काम केले म्हणून लोकांनी आम्हाला मागच्या वेळी मतदान केले आणि आजही केले. मराठी माणूसही आमच्यासोबत आहेत, गैरमराठीही सोबत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आम्ही चांगले काम करू तोपर्यंत लोक आम्हाला मतदान करतील असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं. 

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरेमराठीमुंबई महानगरपालिका