Join us

गृहनिर्माण संस्थांना दिलासा, स्वयंपुनर्विकासासदंर्भात CM फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:46 IST

'स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना पहिली तीन वर्षे प्रीमियमवर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही', अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

'स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना पहिली तीन वर्षे प्रीमियमवर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही', अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (२५ फेब्रुवारी) मुंबई बँकेच्या आर्थिक सहाय्याने चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उदघाटन व चावी वाटप करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या कार्यक्रमात संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्वयंपुनर्विकासामुळे मुंबईच्या बाहेर राहायला जाण्याची वेळ आलेल्या मराठी माणूस आणि मध्यमवर्गीयाच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. आपल्याही जीवनात परिवर्तन घडू शकते हा आत्मविश्वास तयार झाला. यामुळे स्वयंपुनर्विकासाला आत्मनिर्भर हाऊसिंग म्हटले तर वावगे ठरणार नाही."

'स्वंयपुर्नविकासाच्या सेवा राईट टू सर्व्हिसमध्ये आणणार'

"आज जवळपास 1500 गृहनिर्माण संस्थांचे पुनर्विकासाचे प्रस्ताव आले आहेत. स्वयंपुनर्विकासामुळे दलालांची दुकाने बंद झाली. सिंगल विंडो सिस्टीम अधिक प्रभावी आणि सिमलेस करणार आहोत. स्वयंपुनर्विकासाच्या सर्व सेवा 'राईट टु सर्व्हिस' कायद्यांतर्गत उपलब्ध करुन देणार आहोत", अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली.

स्वयंपुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना सरकारचा मोठा दिलासा

"स्वयंपुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पहिली तीन वर्षे प्रीमियमवर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. आतापर्यंत या संस्था व सदनिकाधारकांना सुरुवातीला भरायच्या प्रीमियमवर व्याज द्यावे लागत असे, तसेच बँकेच्या कर्जावरही व्याज द्यावे लागत असे. आता मात्र पहिल्या टप्प्यात मार्च 2026 पर्यंत स्वयंपुनर्विकासाचे जे प्रस्ताव येतील, त्या सर्वांना प्रीमियमवर कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही", अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

बैठ्या चाळींसाठी क्लस्टर स्वयंपुनर्विकासाचा पर्याय अंगीकारता येईल. याबाबत आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करू", असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

"काही लोक मराठी माणसाबद्दल फक्त बोलत राहिले, पण त्यांनी केले काहीच नाही. आम्ही मात्र मराठी माणसाला हक्काचे घर देऊ शकलो, याचे समाधान वाटते. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेने आमचा मुंबईकर उभा करण्याचा मी संकल्प घेतो. मुंबईचे चित्र स्वयंपुनर्विकासच बदलू शकेल, यासाठी मी प्रतिबद्धता आणि कटीबद्धता जाहीर करतो, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला. 

...तर अधिकाऱ्यांची नोकरी जाणार : देवेंद्र फडणवीस

स्वयंपुनर्विकासामुळे अनेक दलाल आणि बिल्डरांची दुकाने बंद होत असल्यामुळे ते यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना नोकरी वाचवता येणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिला.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसबांधकाम उद्योगबँकिंग क्षेत्र