Join us

रक्तसाठ्याची माहिती नाही दिली? भरा १३ लाख; राज्यभरातील १५०हून अधिक रक्तपेढ्यांना दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 09:15 IST

रक्तपेढ्यांनी माहिती न भरल्यास त्यांना प्रति दिन एक हजार रुपये दंड आकारला जावा, असा निर्णय २०२० मध्ये घेण्यात आला होता.

मुंबई : रक्तदानाचे किती शिबिरे आयोजित केली, त्यातून किती रक्तसाठा जमा झाला इत्यादीचा तपशील राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (एसबीटीसी) आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या (एनबीटीसी) संकेतस्थळांवर भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, हे बंधन न पाळणाऱ्या १५० हून अधिक रक्तपेढ्यांना १३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महापालिकेच्या अखत्यारीतील डॉ. आर. एन. कूपर हॉस्पिटल ब्लड सेंटर सर्वात अधिक दंड यांना लावण्यात आला आहे. या दंडाची रक्कम ७० हजारपेक्षा अधिक आहे. हे सेंटर समर्पित बहुद्देशीय सेवाभावी विकास संस्था चालवीत आहे.

मुंबईतील रक्तसाठा कमी गेले काही दिवस दिवस दिवाळीचे असल्यामुळे अनेक जण सुट्ट्यांवर होते, तसेच या सणासुदीच्या दिवसात फार कमी जण रक्तदान करण्यास उत्सुक असतात. त्यामुळे मुंबईत  रक्तदान कमी प्रमाणात झाल्याने रक्तपेढीतील रक्ताचा साठा कमी झाला आहे. 

राज्यभरातील १५०हून अधिक रक्तपेढ्यांना दंड

रक्तपेढ्यांनी माहिती न भरल्यास त्यांना प्रति दिन एक हजार रुपये दंड आकारला जावा, असा निर्णय २०२० मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार, डिसेंबर, २०२२ ते एप्रिल, २०२३ या कालावधीतील माहिती संकेतस्थळावर न भरणाऱ्या रक्तपेढ्यांना दंड करण्यात आला आहे.रक्तपेढ्यांनी रोज सकाळी रक्तसाठ्याची माहिती एसबीटीसीच्या, तसेच एनबीटीसीच्या ई-रक्तकोष या संकेतस्थळावर भरणे रक्तपेढ्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक रक्तगटाचा किती साठा कोणत्या रक्तपेढीत उपलब्ध आहे किंवा नाही, याची माहिती सहजपणे रुग्णांना कळते.अनेक रक्तपेढ्या माहिती देण्यासाठी चालढकल करतात. कधी इंटरनेट बंद असल्याचे कारण, तर काही इलेक्ट्रिसिटी बंद असल्याचे कारण त्यासाठी पुढे केले जाते, तर काही वेळा रुग्णालयातील स्टाफ रजेवर असल्याचे सांगितले जाते. मात्र, यापुढे ही कारणे चालणार नसल्याचे  परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राज्यात ३७६ रक्तपेढ्या असून, त्यापैकी ७६ रक्तपेढ्या या सरकारी आणि महापालिकेच्या तसेच केंद्रीय शासनातर्फे चालविल्या जातात. 

गेले काही दिवस सणासुदीचे असल्यामुळे रक्तदान कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे येत्या काळात रक्ताचा साठा कमी होण्याची शक्यता आहे. याकरिता दोन दिवसांपूर्वी रक्तदान शिबिर आयोजकांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यांना रक्तदान शिबिर आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरुवातीच्या काळात काही रक्तपेढ्या  रक्तसाठ्याची माहिती देत नव्हते. त्यांना नियमाप्रमाणे दंड लावण्यात आला आहे. - डॉ.महेंद्र केंद्रे, सहायक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद.

टॅग्स :रक्तपेढी