पालिकेच्या सीबीएसई शाळांत यंदा वाढ नाही; ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:42 IST2024-12-28T12:37:52+5:302024-12-28T12:42:40+5:30

पालकांचा भ्रमनिरास

No increase in CBSE schools of Mumbai Municipal Corporation this year | पालिकेच्या सीबीएसई शाळांत यंदा वाढ नाही; ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू

पालिकेच्या सीबीएसई शाळांत यंदा वाढ नाही; ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू

मुंबई : महापालिकेच्या सीबीएसईच्या १८ शाळा मुंबईत विविध ठिकाणी सुरू असून, पालकांची वाढती मागणी असूनही यंदा त्यात वाढ होणार नसल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला या शाळांतील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

गरीब आणि कष्टकरी वर्गातील पालकांचा मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याकडे कल आहे. त्यादृष्टीने २०२१ पासून पालिकेनेही आपल्या शाळांचे मुंबई पब्लिक स्कूल असे  रूपांतर करत तेथे सीबीएसईसह इंग्रजी अभ्यासक्रम शिकवण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत सीबीएससी बोर्डाच्या १८ शाळा कार्यरत असून, या शाळांमध्ये गेल्यावर्षी १० हजार ३२७ विद्यार्थ्यांनी नर्सरी ते सहावीदरम्यान प्रवेश घेतला आहे. यामध्ये चिकूवाडी, जनकल्याण, प्रतीक्षानगर, पूनम नगर, कोरबा मिठागर, हरियाली व्हिलेज, राजावाडी, अझिज बाग, तुंगा व्हिलेज, भवानी शंकर रोड (दादर) आणि काणे नगर यासारख्या शाळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यावर्षी मुंबई उपनगरात एक आणि शहरात एक अशा सीबीएसईच्या दोन शाळा वाढवण्याचा पालिकेचा मानस होता. यासाठी जागा शोधण्यासाठी प्रयत्नही सुरू केले. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पालकांना तूर्तास पालिकेच्या सध्याच्या सीबीएसईच्या १८ शाळांवरच समाधान मानावे लागणार आहे.

आमच्या मुलांनाही चांगलं इंग्रजी शिक्षण मिळावं, असं आम्हाला वाटतं, मात्र पालिकेची एकही सीबीएसई शाळा या भागात नाही. आमच्या मतदारसंघात तीन-तीन आमदार असूनही आमच्या विभागात ही सोय नाही. शांती नगरात अशी शाळा आहे. पण तिथवर जाण्यासाठी आम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागतो - मीनाक्षी कदम, वरळी, कोळीवाडा
 

Web Title: No increase in CBSE schools of Mumbai Municipal Corporation this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.