Join us  

 छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचे नाशिकमधील शिवसैनिकांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 11:19 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र...

मुंबई - विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भाजपामधील इनकमिंग मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. विरोधी पक्षांमधील अनेक बडे नेतेसुद्धा सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी इच्छुक आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र नाशिकमधील शिवसैनिकांनी केलेल्या विरोधानंतर भुजबळांसाठी शिवसेनेची दारे जवळपास बंद झाल्याचे चित्र आहे. भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील शिवसैनिकांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.  ''राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सद्दी संपली आहे. ते येवला आणि नांदगावमध्ये जागा वाचवू शकत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे ते शिवसेनेत येत असून, त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी  मुंबईत मातोश्री येथे जाऊन थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्त आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या असल्या तरी त्याबाबत स्पष्ट निर्णय न दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषत: भुजबळ यांना पक्षात घेतल्यास राज्यात त्यांचा फायदा होऊ शकत नाही काय या त्यांच्या प्रतिप्रश्नामुळे संबंधित संभ्रमात पडले असल्याचे वृत्त आहे.विधानसभा निवडणुकीमुळे पक्षांतरे सुरू असून, त्यातच छगन भुजबळ हे स्वगृही परतणार अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेतील एक गटाने भुजबळ यांच्या स्वगृही परतण्यास विरोध सुरू केला आहे. शुक्रवारी शहरात भुजबळ यांच्या विरोधात फलक लागले होते आणि त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असे नमूद करण्यात आले होते. छगन भुजबळ यांना प्रवेश दिल्याने पक्षाला फायदा होणार नाही, असे सांगताना समजा भुजबळ यांना प्रवेश दिलाच तर त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देऊ नये, अशाही भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाछगन भुजबळनाशिक