घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:06 IST2025-09-23T12:04:15+5:302025-09-23T12:06:27+5:30

जुना माल असल्याचे सांगत आधीच्याच दराने विक्री, सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर ज्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत, त्या वस्तू तातडीने कमी दराने विक्री करणे दुकानदारांवर बंधनकारक आहे.

No benefit of 'GST Savings Festival' in nearby grocery stores; Customers' expectations disappointed | घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग

घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग

खलील गिरकर

मुंबई  :  मुंबईतील छोटी किराणा दुकाने आणि मार्टमध्ये पहिल्या दिवशी जीएसटी उत्सव सुरू झालाच नाही. त्यामुळे जीएसटी कपातीच्या लाभाकडे डोळे लावून बसलेल्या ग्राहकांचा अपेक्षाभंग झाल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मध्ये आढळून आले. बहुसंख्य मुंबईकर ज्या किरकोळ दुकानांमध्ये खरेदी करतात, त्यांना पहिल्या दिवशी कपातीचा लाभ मिळाला नाही. 

वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील १२ व २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द केल्याने अनेक वस्तू करमुक्त तर काही वस्तूंचा कर कमी झाला आहे. सोमवारपासून या बदललेल्या स्लॅबप्रमाणे कर आकारणी सुरू करण्यात आली. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी होताना अडथळे आल्याचे समोर आले आहेत. मोठे मॉल आणि काही ठिकाणी कमी झालेल्या दरांप्रमाणे आकारणी सुरू झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र, अनेक ठिकाणी अजून पूर्वीच्या दरानेच वस्तूंची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. किरकोळ दुकानदारांकडे खरेदी केल्यावर जीएसटी बिल मिळत नसल्याने हा फटका बसल्याचे समोर आले आहे.

दादर परिसरातील दुकानांमध्ये हे होते चित्र
दादर परिसरातील काही दुकानांत तूप किलोमागे सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर लोणी ५० रुपयांनी स्वस्त झाले आहे. पिण्याचे पाणी, चॉकलेट व इतर वस्तू मात्र अद्याप पूर्वीच्या दरानेच विक्री होत आहेत. दादर पश्चिम येथील रानडे मार्ग व दादर पूर्व येथील काही दुकानांमध्ये अजूनही पूर्वीच्या दरानेच चॉकलेट, पिण्याचे पाणी, आईस्क्रीम  व इतर वस्तूंची विक्री होत आहे.

स्लॅबमध्ये या वस्तू...
नवीन कररचनेनंतर चॉकलेट, शॅम्पू, टाल्कम पावडर, टूथब्रश, टुथपेस्ट, पिण्याचे बाटलीबंद पाणी, साबण, शेविंग क्रीम अशा विविध वस्तू ५ टक्के स्लॅबमध्ये आल्या आहेत. त्या पूर्वी १२-१८ टक्के स्लॅबमध्ये होत्या. त्यामुळे त्यांचे दर कमी होणे गरजेचे आहे. दैनंदिन वापराच्या, किराणा मालाच्या वस्तू, खाद्यतेल, स्वयंपाक घरातील विविध वस्तू, पीठ, बिस्कीट, तूप, साखर, पास्ता, नोटबुक, पेन्सिल, शैक्षणिक साहित्य अशा विविध वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर ज्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत, त्या वस्तू तातडीने कमी दराने विक्री करणे दुकानदारांवर बंधनकारक आहे. ज्यावेळी दर वाढतात, तेव्हा मात्र एका रात्रीत दर वाढवले जातात. सरकारच्या निर्णयाचा सामान्य नागरिकांना लाभ मिळणे गरजेचे आहे. - विकास अनभवणे, ग्राहक, दादर 

औषधे, घरगुती उपकरणे, टीव्ही, एसी झाले स्वस्त
औषधे, घरगुती उपकरणे, किराणा माल, दुग्धजन्य पदार्थ, टीव्ही, एसी, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, एसी अशा विविध वस्तूंचा कपातीत समावेश आहे. 
किराणा मालाच्या वस्तूंमध्ये काही दुकानदारांनी नवीन कररचनेप्रमाणे दर कमी करून विक्री सुरू केली आहे. तर, काहींनी दर कमी केलेले नाहीत. 

दुकानदारांचे म्हणणे काय?
खरेदी केलेल्या वस्तूंचा साठा पूर्वीच्या दराने केलेला असल्याने पूर्वीच्या दराने विक्री केली जात असल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्यामुळे काही ठिकाणी दुकानदार व ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे दिसून आले.

मॉलमधील वस्तूंवर ‘जीएसटी’त कपात
मॉलमधील बहुसंख्य दुकानांमध्ये जीएसटी उत्सव सुरू झाल्याचे दिसले. इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौंदर्य प्रसाधने, घरगुती वापराच्या पॅकबंद वस्तूंच्या जीएसटीत कपात करून त्याची विक्री सुरू झाली आहे.

Web Title: No benefit of 'GST Savings Festival' in nearby grocery stores; Customers' expectations disappointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी