Join us  

'नितीन नांदगावकरांनी खूप घाई केली; भविष्यात त्यांना नक्की जाणीव होईल'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 7:42 PM

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आजूबाजूच्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण  नितीन नांदगावकर यांनी दिले होते.

मुंबई: मनसेस्टाइल खळ्ळ खटॅक आंदोलनांमुळे प्रसिद्ध असणारे मनसेचे वाहतूक सेनेचे सरचिटणीस  नितीन नांदगावकर यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर नितीन नांदगावकरांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी सेनेत प्रवेश केला असल्याची चर्चा रंगली होती.  मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आजूबाजूच्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण  नितीन नांदगावकर यांनी दिले होते. मात्र नितीन नांदगावकरांनी निर्णय घेण्यात खूप घाई केली असल्याचे वक्तव्य ठाणे- पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष व ठाणे शहराचे मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी केले आहे.

अविनाश जाधव म्हणाले की, नितीन नांदगावकर मनसेचा एक चांगला कार्यकर्ता होता. नितीनने निर्णय घेण्याची खूप घाई केली असून त्याला भविष्यात नक्की जाणीव होईल. तसेच त्यांना जर काही अडचणी होत्या तर राज ठाकरे यांच्याशी चर्चा करुन नक्की मार्ग काढता आला असता असं वक्तव्य अविनाश जाधव यांनी केलं आहे.

नितीन नांदगावकरांचा शिवसेना प्रवेश झाल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले होते. तर, अनेकांना हाच प्रश्न पडला होता की, नितीन नांदगावकर शिवसेनेत कशामुळे? विधानसभेची उमेदवारी न दिल्यानेच त्यांनी सेनाप्रवेश केल्याचंही बोललं जात होतं. मात्र, त्यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलंय. ''राज ठाकरे हे दैवत होते, आहेत अन् राहणार. पण, त्या राजसाहेबांना ज्या साहेबांनी शिवसेना सोडली, त्या बडव्यांना घेतलं होतं. मला राजसाहेबांबद्दल काहीच बोलायच नाही, ते दैवतच आहेत. पण, आजूबाजुच्या बडव्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला,'' असे स्पष्टीकरण नितीन नांदगावकरांनी केले होते.

मनसेस्टाइल खळ्ळ खटॅक आंदोलनांमुळे नितीन नांदगावकर हे चर्चेत आले होते. तसेच त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये अनेकांना न्याय मिळवून दिला होता. हल्लीच त्यांनी टॅक्सी मीटरमध्ये फेरफार करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या टॅक्सीचालकांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनाउद्धव ठाकरे