Join us  

नितीन गडकरींचं वार्षिक उत्पन्न ५४ लाख; मंत्री महोदयांवर एवढे कोटी कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 4:48 PM

नितीन गडकरी हे देशाचे दळणवळण व रस्ते बांधकाम मंत्री आहेत.

मुंबई/नागपूर - देशातील लोकप्रिय नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, प्रदेशाध्यक्ष बानवकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साही जल्लोषात गडकरींनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. गडकरी यांनी अगोदरच सांगितले की, माझी ही लढाई विकासासाठी आहे, त्यामुळे मी प्रचारासाठी कुठलाही वायपट खर्च करणार नाही. लोकांनी मला मी केलेल्या कामाच्या जोरावर निवडून द्यावे. त्यामुळेच, गडकरींची जनमानसांत वेगळीच प्रतिमा आहे. 

नितीन गडकरी हे देशाचे दळणवळण व रस्ते बांधकाम मंत्री आहेत. त्यामुळे, हजारो, लाखो कोटींच्या विकास प्रकल्पांची कामे त्यांच्या नेतृत्वात देशात सुरू असतात. त्यामुळे, त्यांची संपत्ती आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न किती हे जाणून घेण्याची उत्कंठा सर्वांनाच असते. नागपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्याकडी संपत्तीचं विवरण आणि वार्षिक उत्पन्न याबाबतची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. उमेदवारी अर्जात गडकरी यांनी संपत्ती विवरणाची माहिती दिली असून लाखो कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देणाऱ्या नितीन गडकरी यांचे वार्षिक उत्पन्न ५४ लाख एवढे आहे. तर, त्यांच्यावर २ कोटी ४ लाख रुपयांचे कर्जही आहे. त्यामुळे, अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कारण, ज्या रोडची कामे गडकरींच्या सहीने ठेकेदारांना दिली जातात, त्या ठेकेदारांचे वार्षिक उत्पन्न हे गडकरींपेक्षा अधिक आहे. 

उमेदवारी अर्जात दिलेल्या माहितीनुसार, २०१९ साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे मिळून १० कोटी २७ लाख ३४ हजार ८५४ रुपयांची संपत्ती होती. तर २०२४ मध्ये हा आकडा १५ कोटी ५२ लाख ६० हजार ४६ इतका झाला. २०१९ साली गडकरी दांपत्यावर १ कोटी ६२ लाख २९ हजार रुपयांचे कर्ज होते. पाच वर्षांत कर्जाचा आकडा वाढून २ कोटी ४ लाख ९१ हजार १४० वर पोहोचला आहे. २०१७-१८ साली गडकरी दांपत्याचे वार्षिक उत्पन्न ४५ लाख ८३ हजार रुपये होते. २०२२-२३ मध्ये त्यात १८.८४ टक्क्यांची वाढ होऊन तो आकडा ५४ लाख ४६ हजार ९० इतका झाला आहे.

निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे मिळून एकूण १५.५२ कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एकूण कर्जाची रक्कमदेखील वाढली आहे.

अचल संपत्ती जैसे थे, मूल्य वाढले

२०१९ ते २०२४ या कालावधीत गडकरी व त्यांच्या पत्नीच्या नावे कुठलीही नवीन अचल संपत्तीची खरेदी झालेली नाही. २०१९ साली त्यांच्याकडे ८ कोटी ६५ लाख ९७ हजार रुपये मूल्याची अचल संपत्ती होती. आता त्याचे मूल्यांकन १२ कोटी ९४ लाख ८३ हजार इतके आहे. अचल संपत्तीमध्ये १ कोटी ५७ लाख ४१ हजारांची धापेवाडा येथे १५ एकर शेतजमीन, वरळी येथील ४ कोटी ९५ लाख चालू बाजारमूल्य असलेला फ्लॅट, धापेवाडा येथील १ कोटी २८ लाख ३२ हजारांचे वडिलोपार्जित घर, उपाध्ये मार्ग येथील ५ कोटी १४ लाखांचे घर यांचा समावेश आहे. केवळ नितीन गडकरी यांच्या नावे १ कोटी ३२ लाख ९० हजारांची चल संपत्ती व ४ कोटी ९५ लाखांची अचल संपत्ती आहे.

वाहनांचे मूल्य घटले

२०१९ साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे एकूण सहा कार होत्या व त्यांचे तत्कालिन मूल्य ४६ लाख ७६ हजार इतके होते. आता गडकरी दांपत्याकडे सहा वाहने असून त्यांचे मूल्य ४५ लाख ९४ हजार इतके आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत त्यांनी दोन कार खरेदी केल्या. 

टॅग्स :नितीन गडकरीनिवडणूकलोकसभा निवडणूक २०२४नागपूर