Nightlife is fine; But what about security? | नाइट लाइफ ठीक आहे; पण सुरक्षेचे काय?

नाइट लाइफ ठीक आहे; पण सुरक्षेचे काय?

 - सचिन लुंगसे
मुंबई : मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याबाबत सरकारने पाऊल उचलले आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत नाईट लाईफ सुरूही होईल. मात्र मुंबईत केवळ नाइट लाइफ हा एकच विषय राहिला आहे का? येथील झोपड्यांच्या पुनर्वसनाचे, पुनर्विकासाचे काय. माहुलकरांच्या पुनर्वसनाचे काय. महिलांच्या सुरक्षेचे काय. वृद्धांच्या सुरक्षेचे काय; असे किती तरी प्रश्न असताना सरकार नाइट लाइफबाबत एवढे आग्रही का? आणि नाइट लाइफबाबत आग्रही असले तरी त्यानंतर पोलिसांवर येणारा सुरक्षेचा ताण, महिलांची सुरक्षा हे मुद्दे कसे हाताळणार?
असे अनेक सवाल करत गरजेच्या, आवश्यक वस्तूंसाठी मुंबईत नाइट लाइफ नक्कीच सुरू करावे. मात्र हे करताना कोणत्याही गोष्टीवर ताण पडणार नाही. शिवाय सुरक्षेचा मुद्दाही निकाली निघेल; यावरही सरकारने लक्ष द्यावे, असा सूर मुंबईकर जनतेने लगावला आहे.

नाइट लाइफबाबत ‘लोकमत’ने विविध क्षेत्रांतील, विविध संस्थांच्या लोकांशी संपर्क साधला. आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. विधीतज्ज्ञ नीलेश प्रकाश शेळके यांच्या मते नाइट लाइफमुळे सुरक्षा यंत्रणांवर येणारा ताण हा प्रमुख मुद्दाही लक्षात घेतला पाहिजे. मुंबईची लोकसंख्या आणि त्याकरिता असलेल्या तुटपुंज्या पोलीस यंत्रणेवर नाइट लाइफमुळे पुन्हा ताण येईल. परिणामी नाइट लाइफची खरेच गरज आहे का? याचा सरकारने पुन्हा एकदा विचार करणे गरजेचे आहे.

नवोदित लेखक सचिन कृष्णा तळे यांच्या म्हणण्यानुसार, रात्रंदिवस जागे राहणारे शहर म्हणजे मुंबई. मग अशा मुंबईत जर दुकाने, हॉटेल्स, मॉल्स तसेच खास करून जर मेडिकल, ग्रंथालये २४ तास सुरू राहणार असतील आणि तेही आहे त्या रकमेवर; म्हणजे रात्रीची वेळ म्हणून अतिरिक्त पैसे न घेता तर स्वागतच. पण पब, वाईन शॉप, बार यावर बंदी कायम राहावी. अन्यथा सामान्य नागरिकांना तसेच पोलिसांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यासोबत रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर येऊ शकतो. नाइट लाइफ ही कामगार, गरजू लोकांच्या दृष्टीने असावी. अन्यथा त्याचा गैरफायदा तळीराम घेतील.

समाजसेवक गणेश महाबळ शेट्टी यांच्या मते नवी पिढी सोशल मीडियामुळे आपल्या कुटुंबापासून दूर जात आहे. नाइट लाइफ सुरू झाली तर ही पिढी आपल्या नजरेसमोरूनही दुरावेल. डान्स बार किंवा इतर अनेक कारणांमुळे जे लोक घरी जात नाहीत; अशा लोकांसाठी हे ठीक आहे. मात्र महिलांना याचा खूप मोठा त्रास होईल. पुरुष, महिला, वयस्कर व्यक्ती जे आपल्या कुटुंबीयांची वाट बघत बसलेले असतात; ते शांतपणे झोपू शकणार नाहीत. झोपडपट्टी चळवळचे अध्यक्ष घनश्याम भापकर यांच्या म्हणण्यानुसार, नाइट लाइफमुळे कोणाच्या आयुष्यात किती बदल होईल ते माहीत नाही. मात्र मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोक झोपड्यांत राहतात. त्यांच्या पुनर्वसनाचे काय. पुनर्विकासाचे काय. मुंबईकर जनतेची गरज काय आहे? याकडे लक्ष दिले पाहिजे. श्रीमतांना आणखी श्रीमंत करण्यावरच भर दिला जाणार असेल तर गरिबांचे काय?

वॉचडॉग फाउंडेशनचे संस्थापक गॉडफ्रे पिमेंटा यांच्या मते राज्य सरकारने नाइट लाइफचा जो उपक्रम हाती घेतला आहे त्याचा निश्चितच पर्यटक आणि इतरांना फायदा होईल. मात्र ऐनरात्री बाहेर पडलेल्या विशेषत: महिला वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येईल.

दैनंदिन आयुष्य विस्कळीत होण्याची भीती

माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद घोलप यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच जगातील प्रसिद्ध शहर आहे. त्यामुळे मुंबईमध्ये जगभरातून पर्यटक मुंबईत येतात. मुंबईचा चाकरमानी हा दिवसभर कामात असतो. त्यामुळे या चाकरमान्यांना आपल्या परिवाराला बाहेर घेऊन जाण्यासाठी वेळच मिळत नाही. मुंबई रात्रभर सुरू राहिल्यास पर्यटकांसाठी सोयीचे ठरेल. तसेच मुंबईतील चाकरमानीसुद्धा याचा आस्वाद घेऊ शकतील. काही वर्षांपूर्वी टांग्यातून रात्री लोक समुद्रकिनारी फिरायचे. त्याची मौज काही औरच होती. तेव्हा रात्री टांगासुद्धा पुन्हा सुरू करण्यात यावा.

मुंबईकर राकेश पाटील यांच्या मते नाइट लाइफमुळे पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा आणखी वाढेल. आपण आपली संस्कृती विसरून जावू. आपली संस्कृती लोप पावेल. शिवाय नाइट लाइफमुळे सर्वसाधारण म्हणजे दैनंदिन आयुष्यही डिस्टर्ब होईल. त्यामुळे सरकारने याबाबत पुन्हा विचार करावा.

Web Title: Nightlife is fine; But what about security?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.