‘त्या’ महिलेची एनआयएकडून चौकशी, सचिन वाझे कनेक्शनप्रकरणी तपास; अटकेची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 08:40 IST2021-04-03T08:39:44+5:302021-04-03T08:40:02+5:30
Sachin Vaze case : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेला मदत केल्याच्या संशयातून मीरा रोड येथील मीना जॉर्ज या महिलेची एनआयएने गुरुवारी तब्बल १३ तास चौकशी केली.

‘त्या’ महिलेची एनआयएकडून चौकशी, सचिन वाझे कनेक्शनप्रकरणी तपास; अटकेची शक्यता
मुंबई / मीरा रोड : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेला मदत केल्याच्या संशयातून मीरा रोड येथील मीना जॉर्ज या महिलेची एनआयएने गुरुवारी तब्बल १३ तास चौकशी केली. त्यानंतर शुक्रवारी चौकशीसाठी तिला पुन्हा एनआयए कार्यालयात नेण्यात आले. याप्रकरणी तिला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मीरा रोडच्या कनकिया परिसरातील सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये सी विंगमध्ये फ्लॅट नंबर ४०१ मध्ये मीना जॉर्ज भाडेतत्त्वावर राहण्यास आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा फ्लॅट बंद होता. १६ फेब्रुवारीला ट्रायडंट हॉटेल येथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली महिला मीना जॉर्जच असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तिचा शोध घेत असलेल्या एनआयएने मीना जॉर्जला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. त्यानंतर तिला मीरा रोड येथील घरी चौकशीसाठी नेण्यात आले. गुरुवारी सायंकाळी दाखल झालेली टीम तब्बल १३ तासांनंतर सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्समधून सकाळी ७ नंतर बाहेर पडली. त्या वेळी तिच्या चेहऱ्यावर बुरखा होता. मीना जॉर्ज राहत असलेला फ्लॅट पीयूष गर्ग यांच्या मालकीचा असून, जाफर शेख या इस्टेट एजंटच्या माध्यमातून ती गेल्या चार वर्षांपासून आपल्या मुलांसह राहत असल्याचे समजते. एनआयएने गर्ग यांच्याकडेही चौकशी केली.
या महिलेबाबत कमालीचे गूढ होते. या महिलेचा वाझेने रचलेल्या कोणकोणत्या कटांमध्ये सहभाग होता, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. तिने दिलेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतरच तिचा सहभाग निश्चित होईल, अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली. उद्या तिची कसून चौकशी केली जाईल.