अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:50 IST2025-10-10T05:50:29+5:302025-10-10T05:50:43+5:30
वाझे यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांनी न्यायालयाला कार्यक्षेत्र नसल्याचा, तपासातील विसंगती आणि कायद्याने आवश्यक असलेल्या परवानगीअभावी खटला रद्द करण्याची मागणी केली होती.

अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी केल्याच्या आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणात माजी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा खटला रद्द करण्याचा अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने गुरुवारी फेटाळला.
वाझे यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांनी न्यायालयाला कार्यक्षेत्र नसल्याचा, तपासातील विसंगती आणि कायद्याने आवश्यक असलेल्या परवानगीअभावी खटला रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, विशेष न्यायाधीश चकोर बाविसकर यांनी त्यांचा अर्ज फेटाळला.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) वतीने सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी वाझे यांचा अर्ज कायदेशीरदृष्ट्या कमकुवत असल्याचे सांगितले तसेच, वाझे यांनी हे गुन्हे वैयक्तिक क्षमतेतून केले असून ते गंभीर स्वरूपाचे आहेत, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले.
न्या. बाविसकर यांनी सुनावणीदरम्यान म्हटले की, फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी)मध्ये न्यायालयाला आरोपीविरुद्ध चालू असलेली कार्यवाही थेट रद्द करण्याची कोणतीही तरतूद नाही. वाझे यांनी यापूवीर्ही याच कारणांवर आधारित अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला होता आणि तो फेटाळण्यात आला होता.
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही गाडी सापडली होती. या गाडीचा ताबा असलेले व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च २०२१ रोजी ठाणे जिल्ह्यातील एका खाडीत आढळला होता. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये वाझे आरोपी आहे.