Join us

विश्वासार्ह बातम्यांसाठी वृत्तपत्रांनाच सर्वाधिक पसंती; ‘अर्न्स्ट अँड यंग’च्या सर्वेक्षणाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 06:41 IST

सर्वेक्षणात सहभागी ४ हजार लोकांपैकी 35% लोक खात्रीलायक बातम्यांसाठी वृत्तपत्रांवरच सर्वाधिक विश्वास ठेवतात.

मुंबई : कोरोना संसर्गाच्या साथीसारख्या भीषण संकटातही महानगरे व बिगरमहानगर क्षेत्रामधील लोकांनी खात्रीलायक बातम्या मिळविण्यासाठी वृत्तपत्रांवरच सर्वाधिक विश्वास दाखविला आहे. अर्न्स्ट अँड यंग (इवाय) या कंपनीतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात महानगरांमध्ये ३२ टक्के घरांत तर बिगरमहानगर क्षेत्रांमध्ये ६५ टक्के घरांत सकाळी वृत्तपत्रे पोहोचतात, असेही आढळून आले आहे.

या सर्वेक्षणात ४ हजार जणांना सहभागी करून घेण्यात आले. त्यात महानगर व बिगरमहानगर क्षेत्रांतील प्रत्येकी दोन हजार लोकांचा समावेश होता. कोरोना साथीमुळे प्रसारमाध्यमांवर नेमका काय परिणाम झाला आहे तसेच वाचक , ग्राहक या माध्यमांबद्दल सध्या नेमका काय विचार करतात याचा शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणात सहभागी ४ हजार लोकांपैकी 35% लोक खात्रीलायक बातम्यांसाठी वृत्तपत्रांवरच सर्वाधिक विश्वास ठेवतात. 6% लोकांनी वृत्तवाहिन्यांच्या बाजूने कौल दिला. २० टक्के लोकांना विश्वासार्ह बातम्यांसाठी आॅनलाइन न्यूज पोर्टल योग्य वाटतात.तर उर्वरित २८ टक्के लोकांनी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आॅनलाइन न्यूज पोर्टल ही तीनही माध्यमे सारख्याच ताकदीची असल्याचे मत मांडले.

डिजिटल माध्यमांतील बातम्या किती वाचल्या जातात याचाही मागोवा या सर्वेक्षणात घेण्यात आला. महानगरांमधील ७७ टक्के व बिगरमहानगरांमधील ७५ टक्के वाचक आॅनलाइन न्यूज वाचतात. कोरोनाची साथीच्या काळात डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मीडियावर लोक अधिक वेळ घालवितात, असे आढळून आले.

ओटीटीवर कार्यक्रम पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ

ओटीटीवरील कार्यक्रम पाहाणाऱ्यांच्या संख्येत लॉकडाऊन लागू झाल्यानंतर लक्षणीय वाढ झाल्याचे दिसले. महानगरक्षेत्रातील ७२ टक्के लोक ओटीटी कार्यक्रम पाहाण्यासाठी जास्त वेळ खर्च करतील, असा एक अंदाज आहे. बिगरमहानगरक्षेत्रात हीच संख्या ६६ टक्के इतकी आहे. बिगरमहानगर क्षेत्रातील लोक काही माध्यमांसाठी महानगरातील लोकांपेक्षा जास्त वेळ खर्च करतील, अशी शक्यता या दिसून आली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई