Join us  

'ह्या' बातम्या चुकीच्या आहेत, खासदार संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2021 3:38 PM

ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू.पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच.

ठळक मुद्देखासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ५ जानेवारीला ईडीकडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. यासंदर्भात काही माध्यमांत बातम्याही आल्या आहेत. तसेच, या मोर्चावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन असा कुठलाही मोर्चा वगैरे नसल्याचे स्पष्टपणे सांगितलय. 

ईडीच्या विरोधात शिवसैनिक ईडी कार्यालयावर मोर्चा काढणार यासंदर्भात काही माध्यमांत बातम्या आल्या आहेत. आमदार नितेश राणेंनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे… हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही… हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही… हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही… पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?," असे ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. त्यानंतर, काही वेळातच खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन शिवसैनिकांना आवाहन केलंय. तसेच, मोर्चासंदर्भातील बातम्या खोट्या आहेत, असेही त्यांनी सांगितलंय. 

''ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू.पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही.शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो,'' असे ट्विटर राऊत यांनी केलंय. 

दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ५ जानेवारीला ईडीकडून चौकशी होणार आहे. तेव्हा शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ५ जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेने आता ईडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

संजय राऊत यांच्या वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रे घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते. हे संपूर्ण प्रकरण HDILशी संबंधित आहे. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केली होत. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होते. मात्र, पुढे या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्यात आला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचे काम HDIL कडून करण्यात येत होते. त्यात अनियमितता समोर आल्यानंतर वाधवान बंधूंना अटक करण्यात आली.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाअंमलबजावणी संचालनालयमुंबई