नववर्षाचा जल्लोष, पार्ट्यांवर पडणार धाड; पालिका घेणार पोलिसांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 13:57 IST2021-12-16T13:56:37+5:302021-12-16T13:57:33+5:30
महापालिकेच्या दोन पथकांची राहणार नजर; वाचा काय असतील नियम.

नववर्षाचा जल्लोष, पार्ट्यांवर पडणार धाड; पालिका घेणार पोलिसांची मदत
मुंबई : परदेशी पाहुण्यांमुळे ओमायक्रॉनचा धोका वाढल्याने महापालिकेने मुंबई विमानतळावर काटेकोर तपासणी सुरू केली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने २४ प्रशासकीय विभागांत प्रत्येकी दोन पथके तयार केली आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाच्या पार्ट्या, जल्लोषावर या पथकाचे लक्ष असणार आहे. नियम मोडणाऱ्या सभागृह, हॉटेलमालक यांच्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. दक्षिण आफ्रिका, युरोप अशा देशांमधून आलेल्या बाधित प्रवाशांमुळे ओमायक्रॉनचाही मुंबईत शिरकाव झाला आहे.
सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने विनामास्क फिरणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. अनेक ठिकाणी कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. २५ ते ३१ डिसेंबर या काळात नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष व पार्ट्या मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. कोणताही धोका न पत्करता गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर विभागस्तरावर लक्ष ठेवले जाणार आहे.
महापालिकेमार्फत २४ विभागस्तरांवर प्रत्येकी दोन पथके तयार करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार प्रत्येकी दोन पथके वाढविण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे. ही पथके त्या त्या विभागांतील हॉटेल, बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागेतील कार्यक्रम यावर लक्ष ठेवून असणार आहे. या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या क्षमतेएवढे अथवा त्यापेक्षा कमी लोकांची हजेरी असणे अपेक्षित आहे. तसेच मालक, कर्मचारी, ग्राहक यांच्या तोंडाला मास्क आणि सुरक्षित अंतर असणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडून सुधारित नियमावली येण्याची शक्यता आहे.
असे आहेत नियम
- बंदिस्त हॉल, हॉटेलमध्ये त्या जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के तर मोकळ्या जागेतील कार्यक्रमांना २५ टक्के उपस्थितीची परवानगी आहे.
- हॉटेल, रेस्टॉरंट, सभागृह, पब आदी ठिकाणी पालिकेची पथके पोलिसांसह अचानक धाड टाकणार आहेत.
- क्लीन उपमार्शल ठिकठिकाणी तैनात ठेवले असून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
मुंबईकरांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, कोणत्याही पार्टीला किंवा गर्दी होईल अशा गोष्टींना परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी अधिक सतर्क़ रहावे.
अस्लम शेख, पालकमंत्री
पथके प्रत्येक विभागात लक्ष ठेवून कोविड नियम पाळले जात असल्याची खातरजमा करतील. मात्र, प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी पार्ट्या, खासगी कार्यक्रम घरगुती व छोट्या प्रमाणातच करावेत.
सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त