महामुंबईत लवकरच नवीन रिक्षा-टॅक्सी मीटर टेस्टिंग केंद्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:24 IST2026-01-06T12:24:18+5:302026-01-06T12:24:18+5:30
या निर्णयामुळे मीटर तपासणीसाठीची प्रतीक्षा कमी होणार आहे.

महामुंबईत लवकरच नवीन रिक्षा-टॅक्सी मीटर टेस्टिंग केंद्रे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महामुंबईत ऑटोरिक्षा व टॅक्सीच्या मीटर टेस्टिंगसाठी नव्या केंद्रांना परवानगी दिली जाणार आहे. मीटर तपासणीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) हा निर्णय घेतल्याचे प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी सांगितले. या निर्णयामुळे मीटर तपासणीसाठीची प्रतीक्षा कमी होणार आहे.
नियमानुसार मीटरचे कॅलिब्रेशन/रिकॅलिब्रेशन भाडेवाढ झाल्यावर करणे बंधनकारक आहे. मात्र, १५ ते २० मीटर टेस्टिंग केंद्रे असल्याने साडेचार लाखांहून अधिक वाहनांच्या मीटर तपासणीसाठी अपॉइंटमेंट मिळण्यात अडचणी येत आहेत.
दोन महिन्यांत कार्यवाही
वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि मीटर टेस्टिंगची प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी, महामुंबईतील आरटीओ कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील आयटीआय शिक्षण संस्था, तंत्रनिकेतन तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांना मीटर टेस्टिंग संस्था सुरू करण्यास परवानगी देण्याची कार्यवाही दोन महिन्यांत पूर्ण करावी, असे निर्देश एमएमआरटीएने आरटीओंना दिले आहेत.