Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात लसीकरणाचा नवा टप्पा; यंत्रणा सज्ज, राज्याला २६ लाख कोविशिल्ड डोसचा साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 06:48 IST

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आहे. त्यानुसार, येत्या तीन ते चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढविण्याचे आव्हान आहे. त्यानुसार, येत्या तीन ते चार महिन्यांत प्राधान्य गटातील सर्वांना दोन डोस द्यायचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. राज्यात आजपासून ४५ वर्षांहून अधिक व्यक्तींना लसीकरणाचा टप्पा सुरू होणार असून, त्याकरिता केंद्र शासनाकडून राज्याला २६ लाख ७७ हजार कोविशिल्ड लसीचे डोस मिळाले आहेत.  राज्यात या लसीकरण टप्प्यात ३ कोटी ८६ लाख २९ हजार ७८३ नागरिकांना लस देण्याचे लक्ष्य आहे. त्यात मुंबईतील ३९ लाख २ हजार २३३ नागरिकांचा समावेश आहे, तर पुण्यातील ३५ लाख २४ हजार ५९१, ठाण्यातील ४२ लाख ४३ हजार ७७० नागरिक आहेत. उन्हाळा लक्षात घेऊन राज्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व उन्हापासून संरक्षण होईल अशी व्यवस्था उभारण्यात येईल. कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे. मात्र, दर दिवशी ३ लाख लस दिल्या पाहिजेत यादृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. दिवसाला ४० हजार लोकांचे लसीकरणपालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, मुंबईत २ लाख डाेस उपलब्ध आहेत. दिवसाला ४० हजार लोकांचे लसीकरण केले जात आहे. सध्या लसीकरणाची एकूण १०८ केंद्रे असून, त्यापैकी २९ पालिकेची, तर राज्य व केंद्र सरकारची १३ आहेत. त्याचप्रमाणे ६६ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी आहे. आता लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार असल्याने आणखी २६ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आता २ सत्रांत ही मोहीम राबविण्यात येणार असून, सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोनाची लसमुंबई