Join us  

सायन-पनवेल महामार्गावरील उलटलेली क्रेन हटवली, वाहतूक संथगतीनं सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 9:07 AM

मानखुर्द येथील वापरात नसलेल्या पादचारी पुलाचा भाग काढताना पूल कोसळून क्रेनही उलटली होती. ही क्रेन हटवण्यात यश आले आहे.

नवी मुंबई - मानखुर्द येथील वापरात नसलेल्या पादचारी पुलाचा भाग काढताना पूल कोसळून क्रेनही उलटली होती. उलटलेली ही क्रेन सोमवारी (8 ऑक्टोबर) सकाळी  हटवण्यात यश आले आहे. क्रेन हटवण्यासाठी रविवारपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. दरम्यान, मुंबईकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. रविवारी (7 ऑक्टोबर) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सायन- पनवेल महामार्गावर मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.  

सायन-पनवेल महामार्गावर जकात नाक्यालगत मानखुर्द येथील हा पादचारी पूल आहे. दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलाला दीड वर्षापूर्वी एका उंच वाहनाने धडक दिल्यानंतर पडलेल्या पुलाचा अर्धा भाग त्या वेळी काढण्यात आला. तेव्हापासून त्या ठिकाणी अर्धवट स्थितीतील पादचारी पूल होता. या पुलालादेखील काही वाहनांची धडक बसून तोही धोकादायक स्थितीत उभा होता. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. अखेर पुण्यातील कमान कोसळल्याच्या घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी हा अर्धवट अवस्थेतील पुलाचा धोकादायक भाग हटवण्याचे काम रविवारी (7 ऑक्टोबर) हाती घेतले होते. दोन्ही बाजूंनी पुलाचा भाग काढल्यानंतर तो खाली पडू नये, याकरिता त्याला क्रेनचा आधार देण्यात आला होता; परंतु एका बाजूने पुलाचा भाग काढल्यानंतर वजन न पेलल्याने क्रेन उलटून पूल खाली कोसळला. यामध्ये क्रेन चालकासह दोघे जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.

या घटनेमुळे सायन-पनवेल महामार्गावर मुंबईकडे जाणा-या मार्गावर वाशी प्लाझापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा पादचारी पूल हटवण्याचे काम हाती घेण्यापूर्वी प्रवाशांना माहिती देणे आवश्यक असतानाही, तसे न झाल्याने प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. सायन-पनवेल महामार्गावरील अर्धवट अवस्थेतील पादचारी पूल हटवताना नवी मुंबई वाहतूक पोलिसांनाही कळवणे आवश्यक असताना तसे करण्यात आले नाही. क्रेनद्वारे पूल हटवला जात असताना पूल व क्रेन कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.दीड वर्षापासून या पादचारी पुलाचा भाग वापराविना होता. त्याला काही वाहनांची धडक बसल्याने तो पडण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना कळवून पुलाचा भाग हटवण्याचे काम हाती घेण्यात आले होते; परंतु क्रेनद्वारे पूल काढत असताना क्रेन उलटून पूल कोसळला.- किशोर पाटील, अभियंता - सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :अपघातनवी मुंबईमुंबईवाहतूक कोंडी