भारत–न्यूझीलंड क्रीडा सहकार्याला नवी चालना! कांदिवलीत ‘डॉक्टर्स’ क्रिकेट टूर्नामेंट’चा भव्य शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:30 IST2025-11-17T15:29:25+5:302025-11-17T15:30:04+5:30
उत्तर मुंबई खासदार क्रीडा महोत्सवाला आज आंतरराष्ट्रीय गौरव मिळाला, कारण न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकक्ले स्वतः उद्घाटनासाठी हजर होते

भारत–न्यूझीलंड क्रीडा सहकार्याला नवी चालना! कांदिवलीत ‘डॉक्टर्स’ क्रिकेट टूर्नामेंट’चा भव्य शुभारंभ
मुंबई : उत्तर मुंबई खासदार क्रीडा महोत्सवाला आज आंतरराष्ट्रीय गौरव मिळाला, कारण न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅकक्ले स्वतः उद्घाटनासाठी हजर होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांच्या हस्ते कांदिवली (पूर्व), ठाकूर व्हिलेज येथील ठाकूर ग्राउंड मध्ये ‘डॉक्टर्स’ क्रिकेट टूर्नामेंट’ला दिमाखात सुरुवात झाली आणि भारत–न्यूझीलंड क्रीडा, व्यापार व सांस्कृतिक सहकार्याचा नवा अध्याय खुला झाला.
उद्घाटनावेळी बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, “मल्लखांबसारख्या भारतीय पारंपरिक खेळात न्यूझीलंडच्या नागरिकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतातून संघ पाठवण्याचा प्रस्ताव मी दिला आहे.” टॉड मॅकक्ले यांनीही उत्साहाने प्रतिसाद देत भारत–न्यूझीलंड भागीदारी अधिक बळकट करण्याचे संकेत दिले. ते हसत म्हणाले, “क्रिकेटने आम्हाला एकत्र आणले आहे; पुढील वर्षी रिमॅचसाठी पुन्हा येणारच! असे त्यांनी आवर्जून सांगितले.
उत्तर मुंबईतील १२ संघांतील २०० डॉक्टरांनी टी–२० फॉरमॅटमधील स्पर्धेला आज सुरुवात केली. सामने १७, १८, १९, २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार असून विजेत्या संघाला आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे दिली जातील. हा पुढाकार आरोग्यसेवा, फिटनेस आणि समाजातील एकतेला नवी दिशा देणारा असून आयुष्मान भारत, फिट इंडिया आणि प्रस्तावित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल या राष्ट्रीय उपक्रमांशी पूर्णतः सुसंगत आहे.
गोविंदा मानवी मनोरे आदी सादरीकरणांनी पाहुण्यांना अक्षरशः मोहून टाकले.तर मल्लखांब वर्ल्ड चॅम्पियन प्रविण शिंदे यांचे मार्गदर्शन विशेष आकर्षण ठरले.यावेळी पीयूष गोयल म्हणाले की,“खेळात पराभव नसतो; जिंकणे किंवा शिकणे असते. पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात भेटू.”उत्तर मुंबई खासदार क्रीडा महोत्सवाने केवळ स्थानिक स्पर्धांना राष्ट्रीय रंग दिला नाही, तर भारत–न्यूझीलंड क्रीडा मैत्रीलाही नवी ऊर्जा दिली आहे.