‘दख्खनची राणी’ला हेरिटेज डायनिंग कार; मध्य रेल्वेकडून मुंबईत ट्रेन महोत्सव साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 11:38 IST2026-03-28T11:36:58+5:302026-03-28T11:38:15+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मध्य रेल्वेकडून या ऐतिहासिक ट्रेनचा ‘ट्रेन महोत्सव’ साजरा करण्यात आला.

‘दख्खनची राणी’ला हेरिटेज डायनिंग कार; मध्य रेल्वेकडून मुंबईत ट्रेन महोत्सव साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई-पुणे प्रवाशांची लाडकी ‘दख्खनची राणी’ म्हणून ओळखली जाणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या डायनिंग कारला हेरिटेज लुक देत ती शुक्रवारी प्रवासी सेवेत दाखल केली. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मध्य रेल्वेकडून या ऐतिहासिक ट्रेनचा ‘ट्रेन महोत्सव’ साजरा करण्यात आला.
डेक्कन क्वीन ही भारतातील अशी एकमेव ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये प्रवासादरम्यान डायनिंग कारमध्ये बसून हॉटेलसारख्या वातावरणात चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येतो. या वैशिष्ट्यांमुळेच या एक्स्प्रेसला लोकप्रियता आहे. महोत्सवाच्या निमित्ताने ट्रेनमधील अंतर्गत सजावट, सुधारित स्वच्छतागृहे, एसी चेअर कारमधील नवीन आसनव्यवस्था आणि कोचच्या आतील भागांची नव्याने रचना यांचा समावेश आहे.
या ट्रेनमध्ये नव्याने प्रवाशांसाठी एअर फ्रॅगरन्स डिस्पेन्सर्सची सुविधाही करून कारला ऐतिहासिक असे आकर्षक स्वरूप देण्यात आले आहे.
१९३० मध्ये गाडी धावली
‘डेक्कन क्वीन’ची सुरुवात १९३० मध्ये सात डब्यांच्या रेकसह झाली होती. पुढे १९६६ मध्ये इंटिग्रल कोचेसचा समावेश करण्यात आला, तर १९९५ पासून एअर ब्रेक सुविधा असलेले रेक वापरात आले.
१५ ऑगस्ट २०२१ पासून या गाडीला विस्टाडोम डबा जोडण्यात आला असून, पश्चिम घाटातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद प्रवाशांना घेता येतो. जून २०२२ मध्ये ‘प्रोजेक्ट उत्कृष्ट’ अंतर्गत एलएचबी डब्यांचा समावेश करण्यात आला. सध्या ही गाडी १६ डब्यांच्या संरचनेसह धावत असून त्यात विस्टाडोम, भोजनयान, आदींचा समावेश आहे.