गणेशोत्सव समन्वयाबाबत पोलिस-पालिकेकडून नवा घोळ; विभागवार बैठका थांबवा, समितीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:02 IST2025-07-31T08:01:59+5:302025-07-31T08:02:03+5:30
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे.

गणेशोत्सव समन्वयाबाबत पोलिस-पालिकेकडून नवा घोळ; विभागवार बैठका थांबवा, समितीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : समन्वय समितीसोबत मुख्य बैठक होण्यापूर्वीच पोलिस आणि पालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विभागवार बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे मंडळांमध्ये संभ्रम असून, त्यातून समन्वयाचा अभाव दिसून येत आहे, असा आक्षेप घेत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने दरवर्षीप्रमाणे समन्वय समितीसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी पोलिस आयुक्त आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे.
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. यावेळी कायदा - सुव्यवस्थेबरोबरच उच्च न्यायालयाने मंडप उभारणी व मूर्ती विसर्जनाबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्य सरकारने यंदा उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. समितीकडून गेली ४३ वर्षे उत्सव साजरा करण्यासाठी पालिका, पोलिस खात्याला सहकार्य करण्यात येत आहे. मात्र, समन्वय समितीसोबत मुख्य बैठक होण्यापूर्वीच विभागवार बैठका घेतल्याने मंडळांत संभ्रम आहे, अशी तक्रार समितीने केली आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांनी गणेशोत्सव काळात २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दीचे नियोजन कसे करावे, याबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करावी, असे समितीने म्हटले आहे.
गणपती आगमन, विसर्जनाबाबत मागण्या
लटकणाऱ्या वायरी, झुकलेल्या फांद्या काढण्याबरोबरच भारत माता, डिलाइल रोड येथील सिग्नलचे पोल बदलावेत. लालबाग परिसरात वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून विशिष्ट ठिकाणी वाहतूक वाळवावी. डिलाइल रोडवर दुहेरी पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीवर परिणाम होतो, त्याबाबत उपाययोजना करावी.