Join us  

पवार-ठाकरे घराण्याच्या मैत्रीचा नवा अध्याय; अखेर शरद पवारांनी बाळासाहेबांचे ऋण फेडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 8:22 PM

पवारांनी नेत्यांच्या मनातली अस्वस्थता ओळखून घेतली होती. ते देखील काय करावे याबद्दल साशंक होते.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या निमित्ताने राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी अस्तित्वात आली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाने एकत्रित येत निर्माण केलेल्या आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. 

यावेळी बोलताना शरद पवारांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. अनेकदा आम्ही भाषणात एकमेकांचा समाचार घ्यायचो, अन् रात्री जेवण करायला एकत्र असायचो, बाळासाहेबांनी लहानतला लहान कार्यकर्त्याला संधी दिली, सामान्य कुटुंबातील कतृत्वान व्यक्तीला राज्यात आणि देशपातळीवर बसविण्याची किमया बाळासाहेबांनी केली. तीच परंपरा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडून पुढे सुरु राहील. सामान्य कुटुंबातील व्यक्तीची काळजी करणारं सरकार असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. या महाराष्ट्र विकास आघाडीच्या निमित्ताने राज्यात पवार-ठाकरे घराण्याचा नवा अध्याय पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुप्रिया सुळे ही नवीन पिढी एकत्र आली. अजित पवारांच्या बंडामुळे सुरुवातीला महाराष्ट्र विकास आघाडीत संघर्ष पाहायला मिळाला. पहिल्यांदाच राजकीय घडामोडीत प्रतिभा पवार यांनी कुटुंब सावरण्यासाठी सहभाग घेतला. 

दरम्यान, सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीची भूमिका शिवसेनेसोबत जाण्याविषयी स्पष्ट होत नव्हती. काँग्रेसलाही राष्ट्रवादीविषयी संदिग्धता होती. मधल्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत म्हणावा तसा संवाद होत नव्हता. त्यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी हस्तक्षेप केला होता. त्यामुळे राज्याला दिशा देणारे राजकारण बदलले होते. 

पवारांनी नेत्यांच्या मनातली अस्वस्थता ओळखून घेतली होती. ते देखील काय करावे याबद्दल साशंक होते. त्याच काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दोघेही शरद पवार यांना भेटले. त्या भेटीनंतर प्रतिभाकाकींनी शरद पवार यांना एक जुनी आठवण सांगितली. सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला उभ्या होत्या, तेव्हा भाजपने त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करून आपली मुलगी निवडणूक लढवत आहे, तिच्याविरुद्ध कोणीही उमेदवार देणार नाही, ती बिनविरोध निवडून येईल असे सांगून सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आपण ठाम उभे असल्याचे सांगितले होते. हा प्रसंग प्रतिभाकाकींनी शरद पवार यांना सांगितला. त्यावेळी बाळासाहेब आपल्या मुलीच्या पाठीशी उभे होते, आज बाळासाहेबांचा मुलगा एकटा पडला आहे, त्याच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. कोणतेही राजकारण न आणता आपण त्याला मदत केली पाहिजे असा आग्रह प्रतिभाकाकींनी धरला होता. त्यानंतर खऱ्या अर्थानी शरद पवार यांनी पूर्णपणे शिवसेनेला सोबत घेऊन पुढची राजकीय आखणी सुरू केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न साकार झालं. या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण शरद पवारांनी फेडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली.  

टॅग्स :शिवसेनाबाळासाहेब ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019