Join us  

'ना पवार, ना ठाकरे, महाराष्ट्रातील 'जनता' हाच महाराष्ट्राचा ब्रँड'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 7:55 PM

खासदार उदयनराजे यांनी महाराष्ट्रातील ब्रँड कोण असा प्रश्न न्यूज 18 लोकमच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना उदयनराजेंनी महाराष्ट्रातील लोकं हेच महाराष्ट्राचा ब्रँड असल्याचं म्हटलंय.

ठळक मुद्देखासदार उदयनराजे यांनी महाराष्ट्रातील ब्रँड कोण असा प्रश्न न्यूज 18 लोकमच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना उदयनराजेंनी महाराष्ट्रातील लोकं हेच महाराष्ट्राचा ब्रँड असल्याचं म्हटलंय.

मुंबई - महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ठाकरे हा ब्रँड आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले होते. ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सामनातून भूमिका मांडली होती. यावरुन भाजपा नेत्यांनी संजय राऊत व शिवसेनेवर जोरदार प्रहार केला होता. आता, खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्रातील ब्रँड कोण? हे सांगितलंय. 

खासदार उदयनराजे यांनी महाराष्ट्रातील ब्रँड कोण असा प्रश्न न्यूज 18 लोकमच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना उदयनराजेंनी महाराष्ट्रातील लोकं हेच महाराष्ट्राचा ब्रँड असल्याचं म्हटलंय. ना ठाकरे, ना पवार महाराष्ट्राची जनता हाच महाराष्ट्राचा ब्रँड आहे. या जनतेला केंद्रबिंदू मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं. त्यावेळी, त्यांनी असं म्हटलं असतं तर स्वराज्य उभा राहिलं असतं का? असा सवालही उदयनराजेंनी विचारला आहे. रयतेचा राजा बनून शिवाजी महाराजांनी राज्य केलं, सर्वसामान्यांच्या मनात घरं केलं, असेही उदयनराजेंनी म्हटलं.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले एकच ब्रँड

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही यांसदर्भात हे काय नवीन? असं म्हणत टोला लगावला होता. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा सवाल करत महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ब्रँड आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच ब्रँड नाही, असंही पाटील यांनी सांगितलं. तसेच, यावरुन मनसेच्या एका नेत्यानं शिवसेनेला उत्तर दिलंय, याची आठवणही पाटील यांनी करुन दिली होती.  

मनसेनंही सुनावलं

ज्यावेळी २००८ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात मनसे लढा देत होती तेव्हा राजसाहेबांच्या बाजूने बोलायला शिवसेना खासदार संसदेत गप्प होते. पाकिस्तानी कलाकारांना हटवण्यासाठी मनसे आंदोलन करत होती तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात मनसेचे ६ नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. २०१४-२०१७ मध्ये बाहेरच्या लोकांविरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना गप्प होती अशी आठवण मनसेने शिवसेनेला करुन दिली आहे. तसेच, महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, तेव्हा कृष्णाने जे कर्णाला म्हटलं होतं, त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म...तेच आज आम्ही सांगतो. बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो जपण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. मात्र, शिवसेनेच्या सादाबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही मनसेचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

राणे बंधुंचाही राऊतांवर प्रहार

ब्रँड प्रकरणावरुन राणे बंधुंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबई असो की, महाराष्ट्र एकच ब्रँड, छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. तर माजी खासदार निलेश राणेंनीही शिवसेनेवर टीका केली आहे. आमदार नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबई असो की महाराष्ट्र.. एकच ब्रँड..छत्रपती शिवाजी महाराज असं एका वाक्यात त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे. 

टॅग्स :उदयनराजे भोसलेशरद पवारबाळासाहेब ठाकरेमहाराष्ट्र