मुस्लीम किंवा ख्रिस्तांना संघाचा विरोध नाही; ‘सेतुबंध’च्या मराठी आवृत्तीचे सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 08:05 IST2023-07-05T08:05:46+5:302023-07-05T08:05:58+5:30
विशिष्ट परिस्थितीत काही प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक असते; पण विचार म्हणून संघ हा मुस्लीम किंवा ख्रिश्चनविरोधी नाही.

मुस्लीम किंवा ख्रिस्तांना संघाचा विरोध नाही; ‘सेतुबंध’च्या मराठी आवृत्तीचे सरसंघचालकांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लीम किंवा ख्रिश्चनविरोधी नाही. हिंदूंचे संघटन करणे हा सकारात्मक विचार घेऊन संघ काम करतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्यावरील ‘सेतुबंध’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी - राजाभाऊ नेने यांनी गुजरातीत लिहिलेल्या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक विमल केडिया याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विशिष्ट परिस्थितीत काही प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक असते; पण विचार म्हणून संघ हा मुस्लीम किंवा ख्रिश्चनविरोधी नाही. कोणालाही विरोध करणे हा संघाचा विचार नाही. संघ प्रतिक्रियावादी नाही तर हिंदू समाजाचे संघटन करणे हा सकारात्मक विचार घेऊन संघ काम करतो. हाच विचार या पुस्तकातही आपल्याला दिसतो, असे भागवत म्हणाले. आणीबाणीच्या काळात तुरुंगात ‘जमात ए इस्लाम’चे लोकही होते. तेव्हा त्यांच्याही संघाविषयीचा दृष्टीकोन बदलला याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
तपस्वी व्यक्तिमत्त्व
रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा परिसस्पर्श ज्यांना झाला त्यातील एक परिससमान व्यक्तिमत्त्व म्हणजे लक्ष्मणराव इनामदार. प्रचंड क्षमता असतानाही या तपस्वी व्यक्तिमत्त्वाने आपल्या मागे पिढ्या घडविण्याचे काम केले. संघाची दृष्टी, संघाचा विचार स्पष्टपणे ज्यांना समजला आहे, असे ते व्यक्तिमत्त्व हाेते, असेही भागवत यांनी सांगितले.