ना एसी, ना फास्ट लोकल, स्थानके बकाल, खासदार हार्बरवर बोलतच नाहीत 

By सचिन लुंगसे | Published: April 16, 2024 07:31 AM2024-04-16T07:31:07+5:302024-04-16T07:32:03+5:30

हार्बर मार्गावरील सेवा कधी सुधारणार, प्रवाशांचा प्रश्न

Neither AC, nor fast local, stations, MPs do not speak at Harbour | ना एसी, ना फास्ट लोकल, स्थानके बकाल, खासदार हार्बरवर बोलतच नाहीत 

ना एसी, ना फास्ट लोकल, स्थानके बकाल, खासदार हार्बरवर बोलतच नाहीत 

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
: हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सोयी-सुविधांअभावी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या तुलनेत या मार्गावरील रेल्वे स्थानके बकाल आहेत. हार्बर रेल्वे कायमच दुर्लक्षित राहिलेली आहे. या मार्गावर फास्ट लोकल धावत नाहीत, तसेच एसी लोकल नसल्याने उन्हाळ्यात घामाघूम होण्याशिवाय पर्याय नसतो. 

हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा वाढाव्यात, स्थानके चकाचक व्हावीत, सेवांचा दर्जा उंचवावा, एसी लोकल सुरू कराव्यात, मार्ग जलद व्हावा, यासाठी खासदारांनी आवाज उठविला पाहिजे. मात्र, खासदार हार्बरवर बोलतच नाहीत, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर दोनच ट्रॅक असल्याने फास्ट लोकल चालविली जात नाही. एसी लोकल हार्बर मार्गावर चालविण्याचा प्रयोग करण्यात आला असला, तरी प्रवाशांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने हा प्रयोगही फसला. 

आता कोरोनानंतर हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरही एसी लोकल चालविण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. वडाळा, कुर्ला ही हार्बर रेल्वे मार्गावरील व्यस्त स्थानके आहेत. कुर्ला रेल्वे स्थानकात, तर लोकलमध्ये प्रवेश करताना प्रवाशांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. उर्वरित रेल्वे स्थानकांवरही थोड्याफार फरकाने हीच स्थिती असून, प्रवाशांच्या सोयी-सुविधा वाढविण्यासाठी खासदारांनी आवाज उठविणे अपेक्षित असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील जुन्या गाड्या हार्बरवर चालविल्या जातात. हे योग्य नाही. पनवेल, कुर्ला आणि वडाळासारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील प्रवासी संख्या वाढत आहे. एसी लोकलची मागणी वाढत आहे. हार्बरवरील सेवेच्या दर्जावर लोकप्रतिनिधींनी बोलावे. - यशवंत जडयार, रेल्वे प्रवासी संघटना 

पनवेल रेल्वे स्थानकावरही मोठी गर्दी होत असून, भविष्यात येथे नवी मुंबईसारखे विमानतळ होणार आहे. त्यामुळे या गर्दीत आणखी भर पडणार आहे. पनवेल रेल्वे स्थानकांतून दिवसभरात अडीच लाख प्रवासी ये-जा करतात. उर्वरित रेल्वे स्थानकांवरही एक लाखांच्या पुढे प्रवाशांचे येणे-जाणे आहे. ऐरोली, मानखुर्द, सीबीडी बेलापूर, वडाळा रोड, गोवंडी या महत्त्वाच्या स्थानकांवरही गर्दी असते.

Web Title: Neither AC, nor fast local, stations, MPs do not speak at Harbour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.