Join us  

जळगाव प्रकरण: 'केव्हाही मुले येतात अन् मुलींना इशारे...'; वसतिगृहाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांची प्रतिक्रिया

By मुकेश चव्हाण | Published: March 04, 2021 8:30 AM

शेजारी राहणाऱ्या एका वृध्द महिलेने देखील संस्थेविषयी अत्यंत वाईट प्रतिक्रिया नोंदविली.

जळगाव/ मुंबई: जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या विषयी सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती तसेच या विषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.

जळगावमधील या प्रकरणाचे राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटले. विरोधकांनी या विषयी गंभीर आरोप केल्यानंतर गृहमंत्र्यांनीही समितीची माहिती दिली. तसेच महिला व बालविकास विभागाने आठ दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले असून हा अहवाल तीन ते चार दिवसात सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली आहे. 

या घटनेबाबत ‘लोकमत’ने वसतिगृहाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांकडून माहिती घेतली असता, देवेंद्र मोरदे यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून संस्थेत खूप वाईट प्रकार होत आहे. रोज केव्हाही मुले येतात. मुलींना इशारे करतात, आतमध्ये जायला परवानगी नाही, पण ते बाहेरुन मुलींशी बोलतात. विशेष म्हणजे संस्थेच्या कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार होतो, पण त्यांच्याकडून प्रतिकार किंवा विरोध केला जात नाही. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नसल्याचे स्पष्ट मत मोरदे यांनी व्यक्त केले.

शेजारी राहणाऱ्या एका वृध्द महिलेने देखील संस्थेविषयी अत्यंत वाईट प्रतिक्रिया नोंदविली. इथलं वातावरण अतिशय गलिच्छ आहे, महिला असल्याने जास्त बोलू शकत नाही, पण आमच्या कॉलनीतून हे वसतिगृह इतर ठिकाणी हलवावे. आमच्या घरात मुली व महिला आहेत. अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर परिणाम होतोय, असेही गल्लीतील महिला म्हणाल्या. दुसऱ्या एका महिलेने येथील संस्थेत चुकीचा प्रकार कधीच घडलेला नाही. बाहेरील लोकांना प्रवेश दिला जात नसल्याचे सांगितले.

पोलीस आणि समितीने नोंदविले जबाब

जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे यांनीही सकाळी वसतिगृहाला भेट दिली. नेमका प्रकार काय झाला, याची चौकशी करून काही जणांचे जबाब नोंदविले. दोन तास थांबल्यानंतर पोलीस तेथून निघून गेले. दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी झालेल्या गोंधळाबाबत पोलिसांनी समोरील घरांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून फुटेज मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांची समिती चौकशी करीत होती.

प्राथमिक अहवाल सादर

या समितीने बुधवारी वसतिगृहात जाऊन तेथील मुली, आरोप करणारी महिला यांचे जबाब घेतले. या सोबतच वसतिगृहाच्या आजूबाजूच्या रहिवाशांचेही जबाब घेतले असून या जबाबामध्ये काही आक्षेपार्ह आढळले नसल्याने समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. असे असले तरी या प्रकरणी सखोल चौकशी सुरूच ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

दोन जणींनी केली अन्यत्र हलविण्याची मागणी

आशादीप वसतिगृहात चौकशीदरम्यान तेथे असलेल्या गरोदर महिलांना काही त्रास होऊ नये, म्हणून अशा तीन महिलांना महिला निरीक्षणगृहात हलविण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी इतरही दोन मुलींना आम्हाला इतरत्र हलवा, अशी मागणी केली असताना त्यांनाही निरीक्षण गृहात हलविण्यात आले आहे. या पाच जणींना निरीक्षण गृहात हलविल्यानंतर वसतिगृहात सद्या १२ मुली आहेत.

‘लोकमत’चे कोण आहेत? लक्ष ठेवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय!

दादा, ‘लोकमत’चे कोण आहेत? हे बघा आम्हाला बोलू दिलं जात नाही. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय, असे तक्रारदार मुलगी खिडकीतून ओरडून सांगत होती. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बोला, असे म्हणताच या मुलीला शासकीय वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांनी हात धरून खोलीत ओढले. ती खाली पत्रकारांशी बोलायला आली तेव्हाही तिला बोलण्यापासून रोखले.

टॅग्स :जळगावपोलिसमहाराष्ट्र सरकार