उद्धव ठाकरेंनी एवढ्या मर्सिडीज कुठे ठेवल्या असतील? अनेकांना जमले नाही, नीलमताईंनी करून दाखवले!

By अतुल कुलकर्णी | Updated: March 2, 2025 09:45 IST2025-03-02T09:45:40+5:302025-03-02T09:45:54+5:30

उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या एवढ्या सगळ्या मर्सिडीज घेऊन कोणाच्या नावाने ट्रॅव्हल एजन्सी तर सुरू केली नसेल..? तेही कळाले तर बरेच होईल...

neelam gorhe allegations on uddhav thackeray and its political consequences | उद्धव ठाकरेंनी एवढ्या मर्सिडीज कुठे ठेवल्या असतील? अनेकांना जमले नाही, नीलमताईंनी करून दाखवले!

उद्धव ठाकरेंनी एवढ्या मर्सिडीज कुठे ठेवल्या असतील? अनेकांना जमले नाही, नीलमताईंनी करून दाखवले!

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई.

प्रिय नीलमताई नमस्कार.
 
बड्या बड्या साहित्यिकांना जे जमले नाही, ते तुमच्या एका मुलाखतीतून तुम्ही करून दाखवले. देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या राजकारणाची पताका आपण फडकवली त्याला तोड नाही. मुलाखतीमध्ये आपण जे गौप्यस्फोट केले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काही तरंग जरूर उमटले. उद्यापासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात देखील या तरंगांचे उधाण येऊ देत, अशी शुभेच्छा सुरुवातीलाच देतो. 

ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद मिळते, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षाची अवनती होत गेली, अशी खंत आपण व्यक्त केली. मी मर्सिडीज दिल्या नाहीत. माझ्यासारख्या काही जणांवर ही वेळ आली नाही. पण अनेकांना मर्सिडीज द्यावी लागली, ही वस्तुस्थिती आहे असे आपण म्हणालात, तेव्हा आम्हाला थेट लोकमान्य टिळकांचीच आठवण आली. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही... असा बाणेदारपणा टिळकांनी दाखवला होता. आपणही, मी मर्सिडीज दिल्या नाहीत, तरीही मी आमदारकी मिळवली... विधानसभेचे उपसभापती पद मिळवले..! हे सांगून आपणही अनोखा बाणेदारपणा दाखवून दिला आहे. साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या विषयावर आपल्या मुलाखतीतून आपण तितक्याच बाणेदारपणे आपला राजकीय प्रवास सांगितला असता तर तमाम महाराष्ट्राला एक वेगळी अनुभूती आली असती. 

कुमार सप्तर्षी यांच्यासोबत युवक क्रांती दलातून आपण सक्रिय समाजकारणाला सुरुवात केली. तेथून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आपण काही काळ राजकारणात होता. त्यांनी अशी काही मागणी केल्याचे आपण कधी कुठे सांगितले नाही. मात्र, आपल्याला शरद पवार यांचे राजकारण भावले आणि आपण त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षात गेलात. खिशात दहा रुपयांचा पेन, पायात साध्या चपला, हातात साधे घड्याळ घालून आयुष्यभर फिरणाऱ्या पवार यांनी कोणाला काय मागितले माहिती नाही? पण आपण त्यांना सोडून हिंदुत्वाचा नारा बुलंद करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलात. तिथे आपल्याला आमदारकी मिळाली. विधानसभेचे उपसभापतीपद मिळाले. त्यासाठी आपल्याला मर्सिडीज द्यावी लागली नाही, हे आपण मुलाखतीत सांगितले. तरीही उद्धव ठाकरे यांनी आपल्याला हे पद कसे काय दिले याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

ठाकरेंकडे विदाऊट इन्कमिंग आउटगोइंग कसे काय झाले..? एकनाथ शिंदे तर ‘देणारे हात’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी कोणाला काय दिले हे समोर आलेले नाही. पण त्यांच्याकडून कोणी कोणी, काय काय घेतले हे जर अशा मुलाखतीमधून समोर आले तर महाराष्ट्राचा राजकीय इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असे आपल्याच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते म्हणत होते. असो. मात्र आपण शिंदे यांनी कोणालाही, काहीही दिलेले नसताना त्यांच्यासोबत गेल्यामुळे आपले विधान परिषदेचे उपसभापतीपद कायम राहिले. दिल्लीत दिलेल्या मुलाखतीमुळे आपली पुढची आमदारकी पक्की झाली अशी प्रतिक्रिया आपल्या जुन्या शिवसेनेतून आली आहे. त्यांना देखील सडेतोड उत्तर देऊन टाका म्हणजे त्यांचेही तोंड बंद होईल..!

जे जे कोणी शिंदे साहेबांसोबत गेले ते ईडी... सीडी... बीडी... कोणालाही न घाबरता गेले. बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही. ही खंत मनात ठेवून सगळे गेले. आपणही त्यांच्यासोबत त्याचमुळे गेला हे वेगवेगळ्या उदाहरणांसह मुलाखतीमधून दाखवून द्यायला हवे. म्हणजे उगाच लोक आपल्याला दोष देणार नाहीत. गेले काही दिवस अजित दादा विनाकारण आपल्या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत...  त्यांच्याच पक्षाचे अमोल मिटकरी यांनी शिंदेसेनेच्या माजी मंत्र्यांची नावे घेत पीए, पीएस वरून कठोर शब्दात टीका केली. दिल्लीच्याच संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या, ‘मला हलक्यात घेऊ नका’, या विधानाचा रोख नेमका कोणाकडे होता, असा सवाल अजित पवारांनी विचारला.

आपले ते विधान अडीच वर्षांपूर्वीचे होते, असे शिंदे यांना सांगावे लागले. विनाकारण आपल्या विरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना..? हल्ली आपल्या पक्षाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत मुख्यमंत्री फडणवीस यांना सतत भेटत असतात. त्यावरूनही बाहेर उलट सुलट चर्चा आहेत. या चर्चांवरही आपण रोखठोक बोलून टाकावे, असे वाटते... 

जाता जाता : उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या एवढ्या सगळ्या मर्सिडीज त्यांनी कुठे ठेवल्या असाव्यात? की त्यांनी सगळ्या मर्सिडीज घेऊन कोणाच्या नावाने ट्रॅव्हल एजन्सी तर सुरू केली नसेल..? तेही कळाले तर बरेच होईल... असो. अधिवेशनासाठी शुभेच्छा. 

- आपलाच बाबुराव
 

Web Title: neelam gorhe allegations on uddhav thackeray and its political consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.