अर्जंट बेड, ॲम्बुलन्स हवी? एका क्लिकवर घ्या माहिती; मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:11 IST2025-09-26T09:10:47+5:302025-09-26T09:11:01+5:30
पालिकेच्या अन्य चार रुग्णालयांप्रमाणे ‘केईएम’मध्येही प्रायोगिक तत्त्वावर ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.

अर्जंट बेड, ॲम्बुलन्स हवी? एका क्लिकवर घ्या माहिती; मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुविधा
मुंबई - महापालिकेच्या कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत, बाह्यरुग्ण (ओपीडी) कक्ष किती वाजेपर्यंत सुरू असतो, रुग्णवाहिका उपलब्ध आहेत का, नसतील तर किती वेळेत उपलब्ध होऊ शकेल, अशी विविध स्वरुपाची माहिती नागरिकांना पालिकेच्या पोर्टलवर आणि चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
कूपर रुग्णालयात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर अन्य रुग्णालयांत ही सुविधा उपलब्ध असेल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.
कूपर रुग्णालयात रुग्णांना उंदीर चावल्याचे प्रकरण तसेच ‘बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर’मधील विविध मुद्द्यांवर तसेच अन्य रुग्णालयांतील सेवा-सुविधा, मनुष्यबळ उपलब्धता, झीरो प्रिस्क्रिप्शन योजना, भविष्यात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघाडे तसेच नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता संजय मोहिते यांनी गुरुवारी वार्तालाप अयोजित केला होता.
पालिकेच्या अन्य चार रुग्णालयांप्रमाणे ‘केईएम’मध्येही प्रायोगिक तत्त्वावर ‘एचएमआयएस’ प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे रुग्णांच्या नोंदी तसेच त्यांची वैद्यकीय माहिती अपडेट ठेवता येते. रुग्णांचा केसपेपर गहाळ झाला, तरीही त्याची जी माहिती डॉक्टरांनी नोंदवली आहे, ती नोंद ‘एचएमआयएस’ प्रणालीत कायम राहते, असे सांगण्यात आले.
किमोथेरपी सेंटर तीन महिन्यांत सुरू करणार
कूपर रुग्णालयात येत्या तीन महिन्यांत किमोथेरपी सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यासाठीच्या प्रशासकीय परवानग्या मिळाल्या आहेत.
नायर कॅन्सर रुग्णालयाच्या १० मजली इमारतीमधील सहा मजल्यापर्यंत बांधकाम पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
व्हीलचेअरची होतेय चोरी
पालिकेच्या सर्व रुग्णालयांत मिळून महिन्याला १० ते १ हजार व्हीलचेअरची चोरी होते. डिस्चार्ज घेताना काही रुग्ण टॅक्सी आणण्यासाठी जातो, असे सांगून व्हीलचेअरवर बसून जातात आणि ती व्हीलचेअरच घेऊन घरी जातात. काही जण रस्त्यावर व्हीलचेअर सोडून देतात. झीरो प्रिस्क्रिप्शन योजनेत अनेक तांत्रिक बाबी असून, त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयात ही योजना अजून लागू झालेली नाही. मात्र, ६० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.