Join us

आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची आवश्यकता - तानाजी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 15:15 IST

Tanaji Sawant : डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले की, राज्याच्या विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य यावर जास्त खर्च करण्याची आवश्यकता आहे.

मुंबई : सुदृढ महाराष्ट्राची संकल्पना राबविण्यासाठी आरोग्यावरील खर्चात वाढ करण्याची आवश्यकता आहे , असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे केले. मुंबई मराठी पत्रकार संघ, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वतीने महिला पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. धनंजय चाकूरकर, पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, कार्यवाह संदीप चव्हाण, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हुंजे,प्रा.एम.बी. टकले आदी उपस्थित होते. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले की, राज्याच्या विकासासाठी शिक्षण आणि आरोग्य यावर जास्त खर्च करण्याची आवश्यकता आहे. कारण या दोन गोष्टीचा सामान्य नागरिकांशी खूप निकटचा संबंध आहे. तसेच या दोन्ही गोष्टी विकासासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या बाबींवर होणारा खर्च वाढायला हवा.  राज्य शासनाच्या वतीने त्याबाबत उपाययोजना करण्यात येतील.

आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे श्री. सावंत यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे सत्तर लाख महिलांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील साडेतीन कोटी महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :तानाजी सावंतआरोग्य