‘कोड’विषयी जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:27 AM2018-06-25T02:27:58+5:302018-06-25T02:28:01+5:30

पांढरे डाग किंवा कोड कशामुळे होतात, याचे नेमके कारण अजूनही समजलेले नाही.

The need of public awareness about 'Code' | ‘कोड’विषयी जनजागृतीची गरज

‘कोड’विषयी जनजागृतीची गरज

Next

मुंबई : पांढरे डाग किंवा कोड कशामुळे होतात, याचे नेमके कारण अजूनही समजलेले नाही. त्वचेतील रंगपेशी हळूहळू अकार्यक्षम होऊन शेवटी नाहीशा होतात. तेथील त्वचा फिकट, पांढरी होऊन पांढरे डाग दिसू लागतात. रंगपेशींच्या अभावामुळे त्वचा सूर्यप्रकाशाने भाजली जाण्याची शक्यता जास्त असते. याव्यतिरिक्त कोडची फारशी काही लक्षणे नाहीत. मात्र, याविषयी अनेकानेक गैरसमजुती समाजात आहेत. त्यामुळे कोड आलेल्या रुग्णांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. परिणामी, या आजाराविषयी जनजागृती वाढविली पाहिजे. शिवाय, हा त्वचाविकार आहे हे स्वीकारले पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
कोड ही एक रंगविकृती आहे. त्वचेच्या खालच्या स्तरामध्ये मेलानीन नावाचे रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी असतात. काही कारणांमुळे त्या नष्ट होऊ लागतात. रंगद्रव्याची निर्मिती थांबल्यामुळे त्या ठिकाणची त्वचा फिकट पडू लागते. कोड आनुवंशिक असते, परंतु पुढच्या पिढीत येईलच, असे मधुमेहासारखे ठामपणे सांगणे अवघड आहे.
कोडास कारणीभूत असणारी दोन जनुके सापडली आहेत, त्यावर संशोधनही चालू आहे. एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त व्यक्तींना कोड असल्यास पुढील पिढीमध्ये ते येण्याची शक्यता वाढते, असे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. मधुरिमा डहाळे यांनी सांगितले.
उपचारास प्रतिसाद न देणाºया व किमान दोन वर्षे स्थिर असणाºया कोडाच्या डागांवर आता रंगपेशीरोपण यशस्वीरीत्या करता येते. रंग असलेल्या ठिकाणची त्वचा काढून, त्यातल्या पेशी विलग करून कोडाच्या डागामध्ये पेरल्यावर अंदाजे सहा महिन्यांत तेथील त्वचेचा रंग पूर्ववत होतो. कोडाचे डाग आकाराने वाढत असतील, अथवा शरीरावर अन्यत्र नवीन डाग उद्भवत असतील, तर मात्र शस्त्रक्रिया करणे योग्य नाही. मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नाची तारीख पक्की करून, लग्नपत्रिका छापल्यावर काही जण शस्त्रक्रियेसाठी त्वचातज्ज्ञांकडे आग्रह धरतात. पण इतक्या कमी कालावधीत त्वचेला पूर्ववत रंग येणे अशक्य असते, असे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. सौमेश चॅटर्जी यांनी सांगितले.
टीबी, डायबेटीस, कॅन्सर, एड्ससारखे रोग भयंकर असले तरी ते दिसत नाहीत. पण ‘कोड’ हा असा दृश्यविकार आहे की त्यामुळे मनाला अधिक कष्ट होतात. लोकांना कॅन्सर झाला तर मरणाची भीती त्रस्त करते, पण कोड झाला तर अवहेलनेची भीती त्यांना जन्मभर पुरते. त्यामुळे अधिकाधिक जनजागृती आणि माहिती तळागाळात पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही डॉ. चॅटर्जी यांनी सांगितले.

आपल्या त्वचेचा रंग कायम तोच राहत नाही. हा रंग दररोज नव्याने तयार होत असतो. पहिला रंग निघूनही जात असतो. रंग तयार करणाºया पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाइट्स’ (रंगपेशी) म्हणतात.
या पेशी शरीरातील काही अंतर्गत कारणांमुळे नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तेथे पांढरा डाग पडतो. हा आजार संसर्गजन्य मुळीच नाही.

कोडाचे प्रकार : रंगपेशी नष्ट होण्याची कारणे खूप गुंतागुंतीची आहेत. अमुक एकाच कारणामुळे रंगपेशी मरतात असे सांगणे कठीण आहे. शरीरावरील पांढºया डागांच्या जागेनुसार कोडाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जनरलाइज्ड - अंगावर कुठेही येऊ शकणारे कोड, यात दोन्ही हातांवर, दोन्ही पायांवर, गुडघ्यांवर समान म्हणजे सिमेट्रिकल डाग दिसू शकतात.
युनिव्हर्सल - अंगावरील सर्व त्वचेवरील रंग हळूहळू निघून जातो आणि त्वचा पांढरी दिसू लागते.
लोकल - अंगावर एखाद्याच ठिकाणी डाग पडतो.
लिप अ‍ॅण्ड टिप - ओठांवर आणि हातांच्या बोटांवर पांढरे डाग पडतात.
सेगमेंटल - शरीराच्या एखाद्या पट्ट्यातच पांढरे डाग पडतात.

Web Title: The need of public awareness about 'Code'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.