Join us  

राष्ट्रवादीचे मिशन मुंबई; पालिका निवडणुकीत शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 9:02 PM

मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची गुरूवारी बैठक झाली. मुंबईत मागील निवडणुकीत १४ पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. परंतु आता मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आगामी पालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळायला हवे. त्यासाठी वॉर्डनिहाय पक्ष संघटनेची बांधणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची गुरूवारी बैठक झाली. मुंबईत मागील निवडणुकीत १४ पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नाहीत. परंतु आता मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डमध्ये उमेदवारांची तयारी केली जाणार आहे. आघाडी होणार आहे. परंतु आम्ही आमच्या पक्षाची तयारी ठेवली आहे. संघटना मजबूत केली जाईल. वार्डनिहाय संघटना बांधली जाणार आहे. पक्षाचे सेल आहेत. त्यांच्या वॉर्ड निहाय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. सत्तेत आल्यावर आता सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवणार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. 

तसेच, १ मार्च रोजी मुंबई राष्ट्रवादीने चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर होईल. सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. शिबिरात पक्षाचे पैसे भरुन रजिस्टर केलेले ५ हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीची सुरुवात या शिबिरातून करणार आहोत. मिशन २०२२ मुंबई महानगरपालिका असे असणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. सकाळी १०.१० वाजता या शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करतील. तर, संध्याकाळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. शिवाय या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे मंत्री उपस्थित राहतील.

टॅग्स :शरद पवारउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपामुंबई महानगरपालिकानिवडणूक