Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा कार्यालयावर राष्ट्रवादीने केले ‘गाजर फेक’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:43 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारविरोधात एल्गार मोर्चाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी थेट मुंबईतील भाजपा कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले.

मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारविरोधात एल्गार मोर्चाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी थेट मुंबईतील भाजपा कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महागाई आणि वीजटंचाईचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालयाच्या दिशेने चक्क गाजरे फेकत आपला रोष व्यक्त केला.

मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी अचानक भाजपा कार्यालयासमोर आंदोलन छेडले. कोणतीही कल्पना न देता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा एक जत्था नरिमन पॉइंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयासमोर दाखल झाला. त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कार्यालयाच्या दिशेने गाजरे भिरकवायला सुरुवात केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात करताच मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील पुरुष कार्यकर्त्यांनी मोर्चा सांभाळत घोषणाबाजीला सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते.‘वाह रे मोदी तेरा खेल, घरपोच दारू महेंगा तेल’, ‘मोदी सरकार हाय हाय’, ‘सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है’, ‘महागाई रद्द झालीच पाहिजे’ अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई राष्ट्रवादीच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये भाजपा कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये टाकत मरिन लाइन्स पोलीस स्थानकात नेले. तिथेही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काही वेळाने पोलिसांनी या कार्यकर्त्यांना सोडून दिले.

इंधन दरवाढ, वीजटंचाईविरोधात राष्ट्रवादीने राज्यभर एल्गार पुकारला आहे. १५ ते २० आॅक्टोबरदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. मात्र, मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन करत आघाडी घेतली. मागण्या मान्य न झाल्यास २० आॅक्टोबरनंतर राज्यभर मंत्र्यांना घेराव घालण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसभाजपा