Join us
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, वर्षा बंगल्यावर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 06:27 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. एकीकडे शिंदे गट आणि ठाकरे गटात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू असताना पवारांनी शिंदेंच्या घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क लढविले जात होते.

मात्र, मुंबईतील मराठा मंदिर संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे भेटीनंतर स्पष्ट झाले. शरद पवार मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष असून, त्या नात्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे निमंत्रण दिले. स्वतः पवार यांनी या भेटीनंतर ट्विट करून ही माहिती दिली. 

महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत तसेच सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी यावेळी चर्चा केल्याचेही पवारांनी या ट्वीटद्वारे सांगितले. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :शरद पवारएकनाथ शिंदे