Join us  

गृहमंत्र्यांसंदर्भातील विधानावरुन राष्ट्रवादीचा संजय राऊतांवर पलटवार  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 3:30 PM

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. तसेच, अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री बनल्याचा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला आहे.

ठळक मुद्देराऊत यांनी ज्या कमतरता दाखवल्या आहेत, त्या आम्ही सकारात्मतेनं घेऊ, अनिल देशमुख हेही सकारात्मकतेनं घेतील, असे मलिक यांनी म्हटले. 

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्यासमोरील स्फोटक प्रकरणातील घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण स्फोटक बनलं आहे. स्फोटक प्रकरणात असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात, त्यामुळे अडचणीत आलेलं सरकार, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यावरून भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्येही ऑल इज वेल नसल्याचं दिसतं आहे. संजय राऊत यांनी अनिल देशमुखांसंदर्भात केलेल्या रोखठोक विधानामुळे आता राजकीय वादंग उठण्याची शक्यता आहे.  

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. तसेच, अनिल देशमुख हे अपघाताने गृहमंत्री बनल्याचा गौप्यस्फोटही राऊत यांनी केला आहे. मात्र, राष्ट्रवादीने हा आरोप फेटाळून लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि संजय राऊत यांचे मित्र नवाब मलिक यांनी संजय राऊतांनी ज्या कमतरतात दाखवल्या आहेत, त्या आम्ही सकारात्मक घेऊ असे म्हटलंय. मात्र, अनिल देशमुख हे 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातही त्यांनी अनेक पदे भूषवली असून त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यामुळे, ते अपघाताने गृहमंत्री झाले, हे म्हणणे चुकीचं असल्याचंही मलिक यांनी म्हटलंय. 

गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. 'सौ सोनार की एक लोहार की' असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते, असेही मत राऊत यांनी रोखठोक मांडले होते. यासंदर्भात, राऊत यांनी ज्या कमतरता दाखवल्या आहेत, त्या आम्ही सकारात्मतेनं घेऊ, अनिल देशमुख हेही सकारात्मकतेनं घेतील, असे मलिक यांनी म्हटले. 

राऊतांच्या विधानावर अजित पवार म्हणतात...

संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. 'सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांबद्दल अशी विधानं करू नये. एकमेकांविषयी बोलताना काळजी घ्यायला हवी. ते काय बोलले, हे त्यांना माहीत आहे. पवारांनी अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरवले आहेत. अनेकदा उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णयदेखील त्यांनी घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार सुरू असताना कोणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये,' अशा शब्दांत पवारांनी राऊत यांनी अप्रत्यक्ष सल्ला दिला.

संजय निरुपम म्हणतात

संजय राऊत यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेना वि. राष्ट्रवादी यांच्यात वाकयुद्ध रंगताना दिसत आहे. त्यातच आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. शिवसेनेनं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या वर्तणुकीवर शंका उपस्थित केली आहे. गृहमंत्र्यांच्या भविष्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे आणि त्यांनी मौन धारण केलं आहे. त्यांना कारवाई करण्यापासून कोणी रोखलं आहे?, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केलाय.   

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसगृह मंत्रालयनवाब मलिक