Join us  

काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या; टर्म संपलेली नसतानाच फॉर्म भरल्यानंतर पटेलांनी वाढवला सस्पेन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 2:10 PM

येणारा काळ स्पष्ट करेल की मी आज राज्यसभेसाठी अर्ज का दाखल केला आहे, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

NCP Praful Patel ( Marathi News ) : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांवरील निवडणूक बिनविरोध होणार आहे. या सहा जागांसाठी भाजपने तीन, राष्ट्रवादीने एक, शिवसेनेनं एक आणि काँग्रेसने एका जागेसाठी उमेदवाराची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीकडून आज प्रफुल्ल पटेल यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. मात्र प्रफुल्ल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार असून त्यांची टर्म संपण्यास आणखी जवळपास साडेचार वर्षांचा अवधी आहे. असं असताना त्यांनी पुन्हा राज्यसभेसाठी अर्ज का भरला, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. याबाबत आता स्वत: प्रफुल्ल पटेल यांनीच भाष्य केलं असून काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या, असं म्हणत पटेल यांनी याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढवला आहे.

"मी राज्यसभेसाठी पुन्हा अर्ज भरला आहे. माझी टर्म सुरू असतानाही मी अर्ज भरल्याने लोकं तर्क-वितर्क लावत आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की, काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या. राजकीय जीवनात काम करत असताना आम्हाला काही ना काही घडामोडी कराव्याच लागतात. आमच्याकडे अनेक लोकं इच्छुक दिसत आहेत. त्यामुळे येणारा काळ तुम्हाला स्पष्ट करेल की मी आज राज्यसभेसाठी अर्ज का दाखल केला आहे," अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. तसंच  मला खात्री आहे की यावेळी बिनविरोध निवडणूक होणार आहे. आमची रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे, असंही ते म्हणाले.

"अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवनवीन गोष्टी घडणार"

राज्यसभेची टर्म संपण्यासाठी चाडेचार वर्षांचा कालावधी बाकी असताना तुम्ही पुन्हा अर्ज भरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देशात याआधी असं कधी घडलं नव्हतं, असा प्रश्न पत्रकारांकडून प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पटेल म्हणाले की, "देशात याआधी कधी नव्हतं घडलं म्हणजे आता घडणारच नाही, असं नाही. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत अशा नवनव्या गोष्टी घडतच राहणार आहेत. त्यामुळे हे का घडलं, हे समजण्यासाठी काही दिवस वाट पाहा."

दरम्यान, "आमची महायुती एकदम घट्ट आहे. चांगलं काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीएचं सरकार नक्की येणार आहे. लोकसभेला ४०० हून जास्त जागा येतील. महाराष्ट्रातही दिशाभूल करणारे सर्व्हे येत असले तरी महाराष्ट्रातही एनडीएच्या ४५ पेक्षा जास्त जागा येतील," असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

सुनील तटकरे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटलं आहे की, "प्रफुल्ल पटेल यांच्या जागी पोटनिवडणूक लागेल. ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची संमती घेतली आहे. काही तांत्रिक गोष्टींचा विचार करुन आमच्या कोअर ग्रुपने हा निर्णय घेतला आहे. पक्षासमोर दहा जणांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली होती. याबाबत पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी सर्व बाजूचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे," असं  सुनील तटकरे म्हणाले.

टॅग्स :प्रफुल्ल पटेलराष्ट्रवादी काँग्रेसराज्यसभा