Join us  

पक्ष, चिन्ह अजितदादांकडे; निवडणूक आयोगाने निकालात नेमकं काय म्हटलं,पाहा १० महत्वाचे मुद्दे

By मुकेश चव्हाण | Published: February 07, 2024 7:49 AM

खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भातील याचिकेवर काही चाचण्यांनंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला.

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. 

खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यासंदर्भातील याचिकेवर काही चाचण्यांनंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या निकालाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत. सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. 

निर्णय देताना निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं?

  1. अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  2. पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची अजित पवारांना परवानगी
  3. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता
  4. महाराष्ट्रातले ४१ आणि नागालँडमधील ७ आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
  5. लोकसभेचे २ खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत. 
  6. एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं. 
  7. महाराष्ट्रातल्या ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं. 
  8. राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हा आणि पक्षाचं नाव सुचवावं. 
  9. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल. 
  10. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत. 

निकाल नम्रपणे स्वीकारतो-

कोणत्याही पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची पद्धत आहे. यानुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. आमचे म्हणणे मांडले, इतरांनीही त्यांचे म्हणणे मांडले. लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असते, त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह घडाळ आणि झेंडा आम्हाला मिळाल्या. आमच्या सोबतच्या ५० आमदारांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. विधासभेत अध्यक्षांसमोरही सुनावणी झाली आहे. ते कधी निकाल देतील ते माहिती नाही. ते लवकरात लवकर निकाल देतील अशी अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.

नवीन पिढीला बरोबर घेऊन...

पक्ष पळवल्याचा आरोप विरोध करत आहेत, असा प्रश्न केला असता अजित पवार म्हणाले, पक्ष पळवण्यचा प्रश्नच कुठे येतो? कोण काय बोलतो, त्याचा आम्ही विचार करत नाही. मी कोणाच्याही आरोपाला उत्तर द्यायला बांधील नाही. आयोगाने आमची बाजू खरी मानली. त्यांच्या बाजूने निकाल गेला असता तर कोर्टात गेलो असतो. आम्ही राज्याची कामे करण्यासाठी इथे आलो आहोत. नवीन पिढीला बरोबर घेऊन राज्यासाठी कामे करत राहू, असंही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :अजित पवारशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र