मुंबई: शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असल्यानं लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र याबद्दल राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाचा निर्णय झालेला नाही. रेल्वे प्रशासन लोकल सेवा सुरू करण्यास जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून केला जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करताना राज्यातल्या भाजप नेत्यांचाही समाचार घेतला आहे.'श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्विट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात,' अशा शब्दांत रोहित पवारांनी केंद्रातील सत्ताधारी आणि राज्यातील विरोधकांवर निशाणा साधला आहे.
स्वार्थी राजकारणासाठी जोमात असणारे विरोधक 'लोकल' प्रश्नावर कोमात; रोहित पवारांचा टोला
By कुणाल गवाणकर | Updated: November 1, 2020 13:48 IST