Join us  

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी; आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी, अधिकचा वेळ लागणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 1:41 PM

NCP Mla Disqualification Case: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी काय निकाल येणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

NCP Mla Disqualification Case: काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. या निकालाविरोधात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाने न्यायालयात दाद मागितली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे. या याचिकेवरील सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. मात्र, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाची सुनावणी वेगळी असल्याने यासाठी अधिक वेळ लागू शकतो, असा कयास बांधला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर एक सुनावणी घेण्यात आल्याचे समजते. या सुनावणीत पाच याचिका दोन गटांत विभागण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. १८ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार असून, या सुनावणीवेळी साक्षीदार निश्चित केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. २६ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ३१ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निकाल द्यायचा आहे.

अजित पवार गटातील आमदारांना अपात्र करावे

राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेसंदर्भात संविधानाच्या दहाव्या सूचीच्या अनुच्छेद २ अ अंतर्गत सुनावणी घेण्यात येणार आहे. अजित पवार गटाने स्वतःहून राजकीय पक्षा सोडल्याने त्यांना अपात्र करावे, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. ही सुनावणी शिवसेनेपेक्षा थोडी वेगळी असल्याने तसेच २६ जानेवारी रोजी सुनावणी पूर्ण होणार असल्याने ३१ जानेवारी रोजी निकाल देणे शक्य नाही. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सात दिवसांची मुदतवाढ मागू शकतात, अशी शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल दिला. भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दोन्हीही आमदार पात्र असल्याचा निकाल दिला. आता राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवारशरद पवारविधानसभा