Join us  

अमेरिकेत गाजणाऱ्या 'त्या' पावसातल्या सभेवर रोहित पवारांचं भाष्य; म्हणाले...

By मुकेश चव्हाण | Published: October 30, 2020 5:06 PM

ज्यो बायडन पावसातील सभेवर राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई/फ्लोरिडा: गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांची साताऱ्यातील सभा प्रचंड गाजली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात भाषण केलं. त्यावेळी त्यांच्यासमोर असलेली गर्दीची जागची हलली नाही. याच सभेनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला या सभेचा फायदा झाला. आता अशीच एक सभा अमेरिकेत झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या ज्यो बायडन यांची पावसातील सभा अमेरिकेत गाजत आहे. त्यातच आता ज्यो बायडन पावसातील सभेवर राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

ज्यो बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही ज्यो बायडन यांनी जोरदार भाषण केलं. ज्यो बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बायडन यांचे पाठिराखे कारमधून त्यांचं भाषण ऐकत होते. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र ज्यो बायडन यांच्या पावसातील सभेची चर्चा महाराष्ट्रातही होत आहे. यावरुन रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे ज्यो बायडन यांच्या सभेवर भाष्य केलं.

रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो. पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे, असं रोहित पवारांनी ट्विटरद्वारे सांगितले.

दरम्यान, काही नेटकऱ्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या १२ वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली. त्यांनी त्याची तुलना करताना बायडन त्या विजयाची पुनरावृत्ती करतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. ओबामा हे राष्ट्राध्यक्ष असताना बायडन उपराष्ट्रपती होते.

टॅग्स :रोहित पवारज्यो बायडनडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र