Join us
Daily Top 2Weekly Top 5

होय, मी भंगारवाला! भंगारांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; मलिकांचा भाजप नेत्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 13:45 IST

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा विरोधकांना थेट इशारा

मुंबई: क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईवर आधीपासूनच शंका उपस्थित करणारे मंत्री नवाब मलिक यांनी आता भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी ठरेल. अनेक बड्या लोकांची नावं समोर येतील. अधिवेशनानंतर त्यांना तोंड लपवायला जागा मिळणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला.

भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. त्याबद्दल आज पत्रकार परिषदेत मलिक यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर १०० कोटींची माझी पात्रता तरी आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माझी सर्व संपत्ती विकली तरी १०० कोटी मिळणार नाहीत. माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे. माझं कुटुंब आजही भंगाराचा व्यवसाय आहे. तुम्ही आजही तिथे जाऊ शकता. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही, असं मलिक म्हणाले.

मोहित कंबोज यांच्यासह भाजप नेत्यांवर मलिक यांनी जोरदार निशाणा साधला. माझ्यावर कधी सोने तस्करीचे आरोप झाले नाहीत. मुख्यमंत्री निधीत जमा केलेला माझा चेक कधी बाऊन्स झाला नाही. माझ्या घरावर कधी सीबीआयचे छापे पडले नाहीत. कोणत्याही बँकेच्या पैशांवर मी कधीच डल्ला मारला नाही, असं म्हणत मलिक यांनी कंबोज यांच्यावर हल्ला चढवला.

होय, मी भंगारवाला आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. या लोकांना भंगारवाल्याची किमया अजून माहीत नाही. भंगारवाला निरुपयोगी गोष्टी जमा करतो. भंगाराचे तुकडे करतो आणि मग ते भट्टीत टाकून त्याचं पाणी पाणी करतो. या शहरात असलेल्या सगळ्या भंगारांचे तुकडे तुकडे करून भट्टीत टाकून त्यांचं पाणी पाणी केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं म्हणत मलिकांनी भाजप नेत्यांना सूचक इशारा दिला. 

टॅग्स :नवाब मलिकसमीर वानखेडेभाजपा