Join us  

...तर हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे; निर्मला सीतारामन यांच्या विधानावरुन आव्हाडांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 1:44 PM

निर्मला सीतारामन यांना पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारण्यात आला होता.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पॅकेजसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. निर्मला सीतारामन यांनी रविवारी  पाचवी पत्रकार परिषद घेऊन २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील शेवटचा टप्पाही विस्तृतपणे सांगितला. त्यामध्ये, २० कोटी जनधन खात्यात १० हजार २५ कोटी जमा केले आहेत तर ८.१९ कोटी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये दिलेत. त्याचसोबत १४०५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहेत. गरीबांना जेवण दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 

निर्मला सीतारामन यांना पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरुन प्रश्न विचारण्यात आला होता. यानंतर  राहुल गांधींच्या टीकेवरुन अर्थमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, राहुल गांधी रस्त्यावर मजुरांसोबत बसून चर्चा करतात, ही ड्रामेबाजी नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. राहुल गांधींनी मजूरांसोबत बसून, त्यांच्याशी चर्चा करुन या कामगरांचा वेळ वाया घालवला. खरंच, मदतीसाठी गेले होते, या मजुरांसोबत चालत जाऊन, त्यांच्या हातातील सामान घेऊन जायला हवं होतं, असं म्हणत अर्थमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, स्थलांतरित मजुरांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूला बसणे, गप्पा मारणे तसेच त्यांच्यासोबत चालणे ही राहुल गांधींची ड्रामाबाजी आहे, असं निर्मला सीतारामन यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणे ड्रामाबाजी आहे, तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे. माणुसकी इथे व्यक्त होते असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

तत्पूर्वी, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 25 मार्चपासून लॉकडाउन सुरू आहे. यामुळे शहरी भागांत राहणारे स्थलांतरित मजूर अेनेक संकटांचा आणि समस्यांचा सामना करत आपापल्या गावी परतत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सुखदेव विहार उड्डानपुलावरून आपापल्या राज्यांत जाण्यासाठी निघालेल्या अशाच काही मजुरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. तसेच, गरीब, शेतकरी आणि कामगार यांना न्याय योजनेच्या धर्तीवर मदत करण्याची मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली. व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आर्थिक पॅकेजवर पंतप्रधानांनी पुनर्विचार करावा, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :निर्मला सीतारामनजितेंद्र आव्हाडराहुल गांधीसोनिया गांधीकाँग्रेस