Join us  

'शिवसेनेचे आंदोलन म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:46 PM

विमा कंपन्यांना शेतकरी पीक विम्याच्या स्वरुपात शंभर टक्के रक्कम भरतो, मात्र नुकसान भरपाई म्हणून त्याची फक्त २० ते ३० टक्के देवून बोळवणं केली जाते.

ठळक मुद्देपीक विमा कंपन्यांवर मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेवर राष्ट्रवादीची टीका पीक विमा कंपन्यांच्या संचालक मंडळावर बहुतांश लोक भाजपाचेउद्धव ठाकरे कोणाविरोधी आंदोलने करत आहेत?राज्य सरकाराच्या विरोधात बोलायला उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंमत नाही

मुंबई - सत्तेत राहून सत्ता उपभोगायची आणि सत्तेतील आपल्या सहकारी पक्षाला विरोध सुद्धा करायचा, याला कसलं राजकारण म्हणायचं? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असं राजकारण सुरू ठेवलंय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह पंडीत यांनी शिवसेनेला लगावला आहे.  राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, यासाठी शिवसेनेने मोर्चा काढलाय त्यावर राष्ट्रवादीने टीका केली आहे. 

राज्य सरकाराच्या विरोधात बोलायला उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंमत नसल्याची टीका पंडीत यांनी केली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने जर आपली साथ सोडली तर आपली गोची होईल, अशी भीती ठाकरे यांना आहे. त्यामुळे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी गत आजच्या घडीला उद्धव ठाकरे यांची झाली असल्याची बोचरी टीका पंडीत यांनी केलीय.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडीत म्हणाले की, पीक विमा कंपन्यांनी उत्तम काम केलं असल्याचं सांगत अनिल बोंडे आणि सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत आपली पाठ थोपटून घेतली खरी..मात्र प्रत्यक्षातले आकडे काही वेगळंच सांगतात. विमा कंपन्यांना शेतकरी पीक विम्याच्या स्वरुपात शंभर टक्के रक्कम भरतो, मात्र नुकसान भरपाई म्हणून त्याची फक्त २० ते ३० टक्के देवून बोळवणं केली जाते. याला सरकार जबाबदार आहे. सरकार शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई का देत नाही, असा सवाल पंडीत यांनी उपस्थित केलाय.

 

तसेच उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पीक विमा कंपन्यांचा भरपाईचा निर्णय १०० टक्के करुन दाखवावं असं आव्हानच पंडीत यांनी दिलंय. पीक विमा कंपन्यांच्या संचालक मंडळावर बहुतांश लोक भाजपाचे आहेत. ज्या काही देणग्या भाजपाकडे आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांश विमा कंपन्यांच्या कनेक्शनमधून आल्याचा दावा सुद्धा पंडीत यांनी यावेळी केला. नुकसान भरपाई तुम्ही शेतकऱ्यांना देणार नसाल तर काय फायदा विम्याचा? उद्धव ठाकरे कोणाविरोधी आंदोलने करत आहेत. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारची जी धोरणे आहेत त्याविरोधी बोलण्याची गरज आहे. पण उद्धव ठाकरे काहीही बोलू शकत नाहीत. त्यामुळे शिवसेनेची जी नौटंकी सुरु आहे, ती केवळ बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे, असा टोला त्यांनी लगावलाय. 

टॅग्स :शिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा