Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी कितीही गोंधळ घातला, तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाहीच; राष्ट्रवादीची ठाम भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 05:32 IST

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी रणनीती ठरवली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विरोधकांना किती गोंधळ घालायचा तेवढा घालू दे, मात्र मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रश्नावरील पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी पक्षाचे नेते, मंत्र्यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत आगामी रणनीती ठरविण्यात आली. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांच्या आक्रमणाला जशास तसे उत्तर देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. 

कोणत्याही परिस्थितीत मलिक यांचा राजीनामा घ्यायचा नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. शिवाय, विरोधकांचे आक्रमण परतविण्यासाठी सज्जता केली जात आहे. मलिक आणि संबंधित घटनांबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संगतवार माहिती ठेवावी. विरोधकांचा हल्ला निष्प्रभ करण्याच्या दृष्टीने सभागृहात त्याची मांडणी करावी. अन्य आमदारांनाही याबाबत माहिती पुरवावी. एकत्रितपणे विरोधकांची खेळी हाणून पाडावी, अशी रणनीती ठरल्याचे समजते.

यासंदर्भात जयंत पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटेनाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि अधिवेशनाच्या आधीच ते सांगायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. आजच्या बैठकीला पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारनवाब मलिक